
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर मंचाचे शुद्धीकरण केल्याच्या घटनेवरून आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत या प्रकरणातील दोषींवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच संविधानाचा सन्मान करत असतील, तर त्यांनी मंचाचे शुद्धीकरण करणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई करावी, असे आव्हान प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
ही घटना अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी असून ती केवळ संविधानाचेच नव्हे, तर एससी/एसटी कायद्याचेही गंभीर उल्लंघन असल्याचे प्रियंका गांधी यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेला २० दिवस उलटून गेल्यानंतरही पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
याआधी शनिवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष केले होते. राहुल गांधी यांनी या प्रकाराला थेट अस्पृश्यता, असे संबोधत यामागे भाजप आणि आरएसएसची विकृत मानसिकता जबाबदार असल्याचा आरोप केला. दलित समाजाने प्रगती करू नये आणि त्यांना सन्मानाने जगता येऊ नये, अशीच भाजप आणि आरएसएसच्या लोकांची विचारसरणी असल्याचे ते म्हणाले.


























































