
धावपळीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे थकवा जाणवणे किंवा स्नायू कमकुवत होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. मजबूत आणि निरोगी शरीरासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसून, योग्य पोषण मिळणेही तितकेच गरजेचे असते. विशेषतः स्नायूंना ताकद देण्यासाठी आणि शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोटीन हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. जर तुम्हालाही दिवसभर ऊर्जेने भरपूर आणि फिट राहायचे असेल, तर महागड्या सप्लिमेंट्सऐवजी तुमच्या रोजच्या घरगुती आहारातच काही प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. जाणुन घ्या तुम्ही कोणते प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकता.
ड्रायफ्रूट्स ग्रीक योगर्ट
ड्रायफ्रूट्ससोबत ग्रीक योगर्ट हा पटकन तयार होणारा आणि प्रोटीनने भरपूर असलेला नाश्ता आहे. हे बमवण्यासाठी साधारण 3/4 कप ग्रीक योगर्ट घ्या आणि त्यावर बदाम, पिस्ता यांसारखे ड्रायफ्रूट्स टाकून लेयर तयार करा. यात थोडे मध आणि तुमच्या आवडीनुसार बेरीज मिक्स करून खाऊ शकता.
अॅव्होकॅडो एग टोस्ट
प्रोटीनयुक्त नाश्त्यासाठी अॅव्होकॅडो एग टोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. अंड्यांसोबत हा टोस्ट बनवण्यासाठी होल-ग्रेन ब्रेडचा वापर करा. यामुळे प्रोटीनचे प्रमाण वाढेल आणि सोबत इतरही अनेक पोषक घटक मिळतील. हे बनवण्यासाठी प्रथम अॅव्होकॅडो उभा कापून त्यातील बी काढून घ्या आणि त्याचा गर एका बाऊलमध्ये चमच्याने काढून घ्या. त्या गरामध्ये लिंबाचा रस, थोडे मीठ आणि काळी मिरी पूड घालून चांगला मॅश करून पेस्ट बनवून घ्या. दुसऱ्या बाजूला, तव्यावर थोडे लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल घालून ब्रेडच्या दोन्ही बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. त्यानंतर त्याच तव्यावर थोडे लोणी घालून तुम्हाला आवडणाऱ्या पद्धतीने अंड्याची डिश तयार करा. तुम्ही हाफ फ्राय , पूर्ण फ्राय केलेले अंडे किंवा स्क्रॅमबल्ड एग बनवू शकता. अंड्यावर हलके मीठ आणि काळी मिरी भुरभुरा. शेवटी शेकलेल्या गरम ब्रेडवर तयार केलेली अॅव्होकॅडोची पेस्ट जाडसर पसरवून लावा. त्यावर तयार केलेले अंडे ठेवा. वरून चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरम गरम अॅव्होकॅडो एग टोस्ट सर्व्ह करा.
चिया सीड्स पुडिंग
सकाळच्या घाईगडबडीत आधीच बनवून ठेवता येणारा हा एक उत्तम प्रोटीन पर्याय आहे. २ मोठे चमचे चिया सीड्स , एक कप दूध आणि तुमच्या आवडीच्या प्रोटीन पावडरचा एक स्कूप एकत्र करून रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी वरून कापलेले ड्रायफ्रूट्स घाला. जर प्रोटीन पावडर नसेल, तर तुम्ही यात थोडे पीनट बटर देखील वापरू शकता.
प्रोटीन रिच स्मूदी
सकाळी झटपट तयार होणारी प्रोटीन स्मूदी हादेखील एक चांगला पर्याय आहे. एक कप ग्रीक योगर्ट घ्या आणि त्यात अर्धा कप कोणतेही फळ टाका. त्यानंतर एक लहान कप पाणी किंवा दूध वापरून हे सर्व ब्लेंड करून घ्या. वरून ड्रायफ्रूट्स आणि बिया टाकून त्याचा आनंद घ्या.
कॉटेज चीज पॅनकेक
पनीर आणि ओट्सपासून बनवलेला हा नाश्ता चविष्ट आणि पौष्टिक असतो. कॉटेज चीज, अंडी, दही, नैसर्गिक गोडवा मधात किंवा गुळ आणि व्हॅनिलीन एक्सट्रॅक्ट एकत्र करून स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करा. या मिश्रणात ओट्स पावडर मिसळा. हे बॅटर वापरून पॅनकेक तयार करा.





























































