
सोशल मीडियावर रिल पाहण्याऱ्यांची संख्ये हल्ली प्रत्येक वयोगटात मोठ्या संख्येने आहे. अल्पवयीन मुलांमध्ये रिल बनवण्याची आणि पाहण्याची क्रेझ सर्वाधिक पाहायला मिळते. मात्र, हेच रिल पाहण्याच आणि रिल बनवण्याच वेड काहींच्या जीवावर बेतलं आहे. अशीच घटना आता उत्तर प्रदेशातील कौशंबीमध्ये घडली आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवर रील पाहण्याची सवय 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या जीवावर उठली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशंबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीएफसी रेल्वे ट्रॅकवर बसून 17 वर्षांचा शनि मोबाईलवर रील पाहत होता. रील पाहण्यासाठी त्याने कानात इयरफोन घातले होते. याचवेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्याला ऐकू आला नाही. मोबाईलच्या आणि रीलच्या नादात पूर्णपणे मग्न असल्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा अजिबात अंदाज आला नाही. ट्रेनची जोरदार धडक बसल्यामुळे शनिचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात एकच शोककळा पसरली. ‘आज तक’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि जीआरपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अशा संवेदनशील ठिकाणी मोबाईल व इयरफोनचा वापर टाळण्याचे आवाहन या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
























































