
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आणि भाजपच्या जातीयवादी आणि भेदभावपूर्ण मानसिकतेचा निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नवी दिल्लीत आरएसएस मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. संविधानाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मनुस्मृतीच्या प्रती आणि पाने जाळून आपला संताप व्यक्त केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय सरचिटणीस हरी कृष्ण यांच्या नेतृत्वाखाली झंडेवालान येथील आरएसएस मुख्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हातात संविधानाची प्रास्ताविका आणि मनुस्मृतीला नकार द्या,असे लिहिलेले फलक घेऊन जमले होते. संविधानाच्या प्रती उंचावत आंदोलकांनी भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे झंडेवालान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनादरम्यान बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांनी भाजप आणि आरएसएसवर सडकून टीका केली. “सध्या देश संविधानाची विचारधारा आणि भाजप-आरएसएसची विचारधारा यांच्यातील मोठी लढाई पाहत आहे. भाजप आणि आरएसएसची विचारधारा ही मनुस्मृतीपासून प्रेरित असून ती पूर्णपणे दलितविरोधी आणि जातीयवादी आहे. मात्र हा देश मनुस्मृतीने नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चालवला जाईल,” असा घणाघात चिब यांनी केला.


























































