जरांगे व मिंधे गटात आव्हाने-प्रतिआव्हाने; परभणीत मराठा आंदोलकांनी शिंदेंना दाखवले काळे झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे उपोषण आंदोलन सुरू असताना परभणीत मिंधे गटाने शेतकरी मेळावा घेतल्याने मनोज जरांगे-पाटील आणि मिंधे गट आज आमनेसामने आले. हा मेळावा रद्द करण्याची मागणी जरांगे-पाटील यांनी केली. मात्र तरीही मिंधे गटाने मेळावा घेतल्याने जरांगे संतापले. ‘‘मेळावा घेऊन तुम्ही मराठा समाजाला आव्हान दिले आहे. तुम्ही ही मोठी चूक केली. त्याची परतफेड मुंबईत करणार,’’ असे प्रतिआव्हान जरांगे यांनी दिले. मराठा आरक्षणावर सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे यांनी शनिवारपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सुरू असतानाच परभणीमध्ये मिंधे गटाचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला. मराठा समाज उपाशीपोटी आंदोलन करत असताना तुम्ही मेळावे आयोजित करता, हा समाजाच्या भावनांशी खेळ आहे. हा मेळावा रद्द करा अशी मागणी जरांगे यांनी केली. मात्र हा कार्यक्रम आधीच ठरला होता. सर्व लोक आलेले आहेत. आता ऑन द स्पॉट कार्यक्रम रद्द होणार नाही, असे संजय जाधव यांनी सांगितले. त्यामुळे खवळलेल्या जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे, संजय जाधव आणि संजय शिरसाट यांच्यावर हल्ला चढवला. ‘‘मेळावा घेऊन शिंदेंनी आव्हान दिले आहे. ते मी स्वीकारतो. आता त्याची परतफेड मुंबईत करणार. येत्या 12 तारखेला आम्ही पुढची घोषणा करणार, असे जरांगे यांनी सांगितले.

बंडय़ाला घरी बसवणार

जरांगेंनी बंडू जाधव यांच्यावर सडकून टीका केली. ‘‘बंडू जाधव हा थर्डक्लास माणूस निघाला. त्याला माज आला आहे. शिरसाट आणि शिंदेंचं ऐकून त्याने चूक केली. त्याचे अस्तित्व मराठय़ांनी उभे केले आहे, पण शेतकऱ्यांच्या आडून तो मराठय़ांच्या उरावर नाचला आहे. पुढच्या वेळी घरी बसावं लागेल तेव्हा त्याला कळेल,’’ असा इशारा जरांगेंनी दिला. जरांगेंनी शिंदेंवर एकेरीत टीका केली. ‘‘एकनाथ शिंदेची पोरं मोठी झाली. कधी रिक्षा चालवतो म्हणतो, कधी बैलगाडी चालवतो म्हणतो,’’ असा टोला जरांगेंनी हाणला.

सरकारचे शिष्टमंडळ आज भेटणार

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी ठणकावले आहे. त्यांच्याकडून सरकारला 15 दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सरकारचे शिष्टमंडळ उद्या जरांगे यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे कायदेशीर चौकटीत असलेल्या मागण्यांसाठी चर्चेची दारे सदैव खुली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

भाषणात गोंधळ

जरांगेंच्या नाराजीचा फटका परभणीतील मेळाव्याला बसला. उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्यात भाषण करायला उभे राहताच मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या आणि काळे झेंडे दाखवले. काही आंदोलकांनी बॅरिकेट्सवरून उडी मारून व्यासपीठाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कारवाई करत 35 आंदोलकांना ताब्यात घेतले. त्याआधी नांदेड विमानतळाबाहेरही तीव्र निर्दशने करण्यात आली.