
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सात मार्गांखालील बोगदा प्रशासनाने अवघ्या पाच दिवसांत खोदला आहे. 23 मीटर खोलीवरून 54 मीटर लांबीचा हा बोगदा असून रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता ही कामगिरी पूर्ण करण्यात आली आहे.
ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाची एकूण लांबी 10 किलोमीटर आहे. त्यापैकी सुमारे 7 किलोमीटर मार्ग भुयारी आहे. प्रकल्पाची रचना ताशी 80 किलोमीटर वेगासाठी करण्यात आली आहे. ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाचे आतापर्यंत सुमारे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. बोगद्याची खोली 12 ते 52 मीटरपर्यंत आहे. या आव्हानात्मक कामासाठी एमएमआरडीएने माती आणि खडकांच्या थरांची माहिती घेऊन भूपृष्ठ भेदक रडारच्या मदतीने जमिनीखालील वस्तू आणि भूगर्भातील बदल शोधण्यात आले. बोगदा खोदताना रेल्वे रुळांवर आणि कर्नाक रोड उड्डाणपुलावर लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
पश्चिम रेल्वेच्या मार्गाखालून बोगदा नेणार
ग्रँट रोड-चर्नी रोडदरम्यान सात रेल्वेमार्गांखालून बोगदा नेल्यानंतर आता पुढील टप्प्यात पश्चिम रेल्वेच्या मार्गाखालून बोगदा नेण्यात येणार आहे. हा बोगदा सुमारे 24 मीटर खोलीवरून जाणार आहे. ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानकांदरम्यान सुमारे 120 मीटरचा रेल्वेमार्गाचा भाग त्याखाली येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2028पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.




























































