
बहीण-भावाचे अतुट नाते जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिनाचे औचित्य साधून खाकीतल्या सखींनीदेखील थेट फलाटावर उतरून प्रवासी भावांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी महिलांची सुरक्षा करण्याबरोबर अनैतिक मानवी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे हात मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नवनाथ रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अंमलदारांनी वडाळा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर प्रवासी पुरुषांना राखी बांधून भाऊ-बहिणीचे पवित्र नाते सांगणारा रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला. यावेळी प्रवासादरम्यान महिलांची सुरक्षा कशी करावी, शिवाय अनैतिक मानवी तस्करी हा कलंक असून त्याला विरोध हा झालाच पाहिजे. हे असामाजिक कृत्य हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन लढले पाहिजे असा संदेश देत प्रवाशांमध्ये खाकीतल्या सखींनी जनजागृती केली. अशाप्रकारे वडाळा रेल्वे स्थानकात रक्षाबंधनाचा आगळावेगळा सोहळा सर्वांनाच अनुभण्यास मिळाला.



























































