
पर्यटकांना घेऊन माथेरानच्या निसर्गाची सफर घडवणारी माथेरानची राणी ‘आजारी’ पडली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या या लाडक्या राणीला तातडीने ‘उपचारा’साठी मुंबईला हलवण्यात आले असून भल्यामोठ्या ट्रेलरमधून टॉय ट्रेनचे हे इंजिन परळ येथील रेल्व यार्डात नेण्यात आले आहे. याठिकाणी अभियांत्रिकी टीमच्या देखरेखीखाली दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पुढील तीन महिने दुरुस्तीचे काम चालणार आहे.
नेरळ ते माथेरान अशा धावणाऱ्या टॉय ट्रेनच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. मात्र पावसाळा सुरू असल्याने दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव टॉय ट्रेन बंद ठेवण्यात आली आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू आहे. दरम्यान टॉय ट्रेन व शटल सेवेसाठी माथेरानमध्ये एकूण आठ इंजिन तैनात आहेत. त्यातील दोन इंजिन सध्या शटल सेवेसाठी कार्यरत आहेत. तर नेरळच्या लोकोशेडमधील उर्वरित पाचपैकी एका इंजिनमध्ये मोठा बिघाड झाला असल्याने हे इंजिन परळ येथील कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहे. दर सहा वर्षांनी टॉय ट्रेनचे इंजिन परळ येथील कार्यशाळेत पाठवले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी सकाळी हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळील रेल्वे क्रॉसिंगवर बंद इंजिन चालू इंजिनला जोडून आणण्यात आले. त्यानंतर सहाय्याने इंजिन कंटेनरवर चढवून मुंबईकडे रवाना करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
मान्सून सुट्टीनंतर दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा सुरू केली जाते. सध्या दस्तुरी-अमन लॉज-माथेरान या मार्गावर शटल सेवा सुरू असून पर्यटक त्याचा लाभ घेत आहेत.
टॉय ट्रेनच्या सेवेत एकूण आठ इंजिन असल्याने एक इंजिन दुरुस्तीसाठी मुंबई येथे रवाना झाले असले तरी याचा कोणताही परिणाम शटल सेवेवर होणार नाही. त्यामुळे पर्यटकांना माथेराच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे.
कर्जत-कल्याण मार्गावर ट्रॅफिककोंडी
माथेरानच्या राणीचे हे इंजिन मुंबई येथे नेण्यासाठी भलामोठा ट्रेलर नेरळ येथे आणण्यात आला होता. महाकाय क्रेनच्या मदतीने हे इंजिन उचलून ट्रेलरवर ठेवण्यात आले. मात्र यामुळे नेरळ येथील क्रॉसिंग परिसरात वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे कर्जत-कल्याण राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.



























































