पालिका तुर्भ्यातच उभा करणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शिंदे गटाच्या विरोधाला प्रशासनाने दाखवला कात्रजचा घाट; नवी मुंबईत दोन सत्ताधाऱ्यांमधील वाद पुन्हा पेटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तुर्भे क्षेपणभूमीमध्ये उभा करण्याचा निर्णय घेऊन शिंदे गटाच्या विरोधाला कात्रजचा घाट दाखवला आहे. या प्रकल्पाविरोधात शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या महासभेत जोरदार गोंधळ घातला होता. मात्र त्यानंतरही प्रशासनाने हा प्रकल्प तुर्भे येथेच होणार असल्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजप यांच्यात पुन्हा वाद उफाळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तुर्भे येथे उभ्या राहणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विरोधात शिंदे गटाने केलेले सर्वच आरोप पालिका प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. नवी मुंबई महापालिका परिसरामध्ये १ हजार ५०० मॅट्रिक टन घनकचऱ्यावर आधुनिक पद्धतीचे वर्गीकरण करून त्यापासून निर्माण होणाऱ्या ६०० टन आरडीएफमधून २७ मेगावॅट प्रतिदिन इतकी विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे. ४५० मॅट्रिक टन घनकचऱ्यावर प्रोसेस करून त्यापासून नैसर्गिक गॅसची निर्मिती होणार आहे. बायोचार फॅसिलिटी व त्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे लिचेट ट्रीटमेंट प्लांट व स्लज ड्रॉइंग फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची समस्या सोडवली जाणार आहे. त्यामुळे विषारी वायू तयार होणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नव्याने लागू झालेला घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अन्वये तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार असे प्रकल्प राबविणे पालिकांसाठी अनिवार्य आहे.

ही एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन सुविधा पारंपरिक कचरा हाताळणी आणि जुन्या कचऱ्याच्या संचयनाशी संबंधित सध्याच्या पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर करण्याऐवजी विशेषत्वाने त्या समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये बायोरेमेडिशन आणि जुन्या कचऱ्याच्या वैज्ञानिक उपचारांचीही तरतूद आहे. त्यामुळे साचलेल्या जुन्या कचऱ्याचे निर्मूलन, विलगीकरण, प्रक्रिया आणि योग्य विल्हेवाट लावण्यात येणार असल्याने कचऱ्याचे प्रमाणही कमी होणार आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

हा प्रकल्प उभा करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेतल्यामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांचे चेहरे पडले आहेत. काही अधिकाऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उभा केला जात असल्याचे आकांडतांडव आता शिंदे गटाने सुरू केले आहे.