पंतप्रधान मोदी यांना आणखी एक सर्वोच्च पुरस्कार, उझबेकिस्तान दौऱ्यात युरेनियम पुरवठय़ावर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑलीय दरजाली दोस्तलिक’ प्रदान करून गौरविण्यात आले. मोदी यांना मिळालेला हा 36 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नागरी अणुऊर्जेसाठी दीर्घकालीन युरेनियम पुरवठा, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि खाणकाम यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्यावर उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी हे उझबेकिस्तान आणि किर्गिझ रिपब्लिक या दोन देशांच्या दौऱयावर आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते त्यांचा ‘ऑर्डर ऑफ ऑलीय दरजाली दोस्तलिक’ या उझबेकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वर्ष 2030 पर्यंत परस्पर व्यापार 5 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट दोन्ही देशांनी ठरविले आहे. उझबेकिस्तानचा दौरा आटोपून ते किर्गिझ रिपब्लिक येथे रवाना झाले.

या क्षेत्रात वाढविणार सहकार्य

व्यापार, पायाभूत सुविधा, दुर्मिळ खनिजे, संरक्षण आणि सुरक्षा, इनोव्हेशन, कृषी, औषधनिर्माण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि ‘यूपीआय’सह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसेच नागरी अणुऊर्जेसाठी दीर्घकालीन युरेनियम पुरवठा, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि खाणकाम यासंदर्भात महत्त्वाचे करार करण्यात आले.