दुखापतीनंतर रश्मिका मंदाना पुन्हा कामावर परतणार; सोशल मीडियावरून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे कामापासून दूर होती. आगामी ‘मैसा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिच्या कमरेला दुखापत झाली होती. त्यानंतर तिने काही काळ विश्रांती घेतली. आता रश्मिकाने चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देत लवकरच पुन्हा कामावर परतणार असल्याचे सांगितले आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पूजा करताना, आपल्या पाळीव कुत्र्यासोबत वेळ घालवताना, पझल्स सोडवताना आणि घरातून बागेकडे पाहत निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे.

या पोस्टच्या माध्यमातून रश्मिकाने सांगितले की, दुखापतीमुळे मिळालेली विश्रांती तिच्यासाठी एक प्रकारची ‘फोर्स्ड हॉलिडे’ ठरली. मात्र, या काळात तिला स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. रश्मिकाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “मी लवकरच कामावर परतत आहे आणि मला या सर्व गोष्टींची नक्कीच आठवण येईल!” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला असून, रश्मिका लवकरच पुन्हा पडद्यावर आणि चित्रीकरणाच्या सेटवर दिसणार असल्याची उत्सुकता वाढली आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला रश्मिकाने स्वतःच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार, ‘मैसा’च्या डान्स शूटदरम्यान तिच्या उजव्या कमरेच्या भागातील एका टेंडनला दुखापत झाली होती. त्यामुळे पाय वर उचलण्यासारख्या काही हालचाली करणे तिच्यासाठी कठीण झाले होते. रश्मिकाने हा चित्रपट आतापर्यंतचा तिचा सर्वात ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ चित्रपट असल्याचे सांगितले होते. दुखापतीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने काही काळ व्यायाम आणि धावण्यापासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला.

‘मैसा’ हा गोंड जमातीच्या पार्श्वभूमीवर आधारित भावनिक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटात रश्मिका एका गोंड महिलेची भूमिका साकारत आहे. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा हे पात्र वेगळे आणि आव्हानात्मक असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘रणबाली’ या चित्रपटातही दिसणार आहे. राहुल सांकृत्यान दिग्दर्शित हा तेलुगू पिरियड ड्रामा ब्रिटिश राजवटीच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित आहे.