
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर प्रदेशातून आपल्या भावाला भेटण्यासाठी निघालेल्या एका 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसचालक आणि कंडक्टरने या मुलीला बसमध्ये बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी दिल्लीतील काश्मिरी गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असून ती इयत्ता 11 वीत शिकते. 4 ऑगस्टच्या रात्री ती घरात कोणालाही न सांगता नोएडामध्ये राहणाऱ्या आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी निघाली होती. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती रस्ता भटकली आणि ग्रेटर नोएडामधील परी चौक येथे चुकीने उतरली.
परी चौकातून एक रिकामी स्लीपर बस जात असताना मुलीने चालकाला थांबण्याचा इशारा केला. बसचालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी ती नोएडा सेक्टर 63 च्या दिशेने जात असल्याचे सांगून मुलीला विश्वासात घेतले आणि बसमध्ये बसवले.
बस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच कंडक्टरने मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर काश्मिरी गेट आयएसबीटी जवळील रिंग रोडवर पीडितेला फेकून देऊन आरोपींनी पळ काढला. पीडितेने तात्काळ काश्मिरी गेट पोलीस ठाणे गाठले व आपबिती सांगितली.
A 16-year-old Class 11 student from Uttar Pradesh’s Mainpuri district was allegedly gang-raped inside a sleeper bus near Delhi’s Kashmiri Gate on August 4. Police arrested driver Kuldeep and conductor Sandeep from Timarpur. The bus was seized for forensic examination. The accused… pic.twitter.com/gZrKr9Ztii
— IANS (@ians_india) August 31, 2026
तपासात समोर आले की, ही बस दुरुस्तीसाठी सुरजपूर येथील वर्कशॉपमध्ये गेली होती. तेथून तिमारपूरकडे परतताना आरोपींनी परी चौकात मुलीला बसवले होते. परी चौक ते काश्मिरी गेट या 47 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान पडद्यांनी झाकलेल्या स्लीपर बसमध्ये हा गुन्हा घडला. पोलिसांनी तिमारपूर येथील पार्किंगमधून कुलदीप आणि संदीप या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच गुन्हा घडलेली स्लीपर बस जप्त करून ती फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

























































