
नीलेश कुलकर्णी [email protected]
जंतर मंतरवरील तरुणांच्या आंदोलनामुळे जमिनीवर आलेल्या भाजपने डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदी एका बैठकीसाठी भाजप मुख्यालयात तब्बल साडेचार तास तळ ठोकून होते. या बैठकीत मोठे विचारमंथन झाल्याचे सांगण्यात येते. बैठकीपासून मोदींचे कान आणि डोळे असणारे अमित शहा यांना ‘सुरक्षित अंतरा’वर ठेवण्यात आले, अशीही चर्चा आहे. नितीन नबीन यांच्या टीमशी मोदींनी वन टू वन चर्चा केली. त्यांच्याकडून इनपुट घेतले. त्यांना जबाबदारी समजावून सांगितली. साडेचार तासांच्या विचारमंथनातून काही ‘अमृत’ बाहेर पडते का, हे यथावकाश कळेलच.
देशभरात मोदी आणि त्यांच्या देशातील युवा वर्ग ‘नीट’ पेपरफुटीचे आंदोलन नीट पद्धतीने न हाताळल्यामुळे विरोधात गेला आहे. साखरसम्राटांना फायदा पोहचविण्यासाठी कृत्रिम साखरटंचाई निर्माण करण्यात आली. मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे उघडय़ावर पडलेला मध्यमवर्ग यामुळे विरोधात गेला आहे. ज्या ज्या घटकांनी मोदी देशासाठी काहीतरी करतील, या अपेक्षेने बहुमताने निवडून दिले ते सर्व आता मोदी सरकारविरोधात उभे राहिले आहेत. स्वतःच रचलेल्या चक्रव्यूहात मोदी अडकले आहेत. साडेचार तासांच्या विचारमंथनातून काही ‘अमृत’ बाहेर पडते का, हे यथावकाश कळेलच.
जंतर मंतरवरील आंदोलनानंतर मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यात देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. दुसरीकडे राहुल गांधींचा वाढता ग्राफ हाही भाजपच्या दृष्टीने चिंता व चिंतनाचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप पदाधिकाऱयांच्या बैठकीत आपली नेहमीची मन की बात न सांगता पदाधिकाऱयांच्या मन की बात ऐकली, हेही त्या पक्षाच्या दृष्टीने आशादायकच म्हणायला हवे. कोणत्याही पक्षाच्या सरकारविरोधात दहा-बारा वर्षांनंतर ऑण्टिइनकम्बन्सी तयार होतच असते. मात्र मोदींविरोधात फक्त ऑण्टिइनकम्बन्सीच नाही तर प्रचंड रोष जनमानसांत आहे. यामुळे जिथे बारा वर्षे सत्तेची फुले वेचली तिथेच गोवऱया वेचण्याची वेळ येऊ नये, म्हणून मोदींनी तब्बल साडेचार तास पक्ष संघटनेसाठी काढली. पक्ष आणि सरकारपुढील आव्हानांचा ऊहापोह या बैठकीत करण्यात आला. पक्ष कसा सामान्यांच्या प्रश्नांपासून दूर गेला, याबद्दल काहीजणांनी खडेबोल सुनावले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा आपली प्रतिमा खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतोय, यावरही एकाने परखड भाष्य केले. बारा वर्षांनंतर का होईना, नरेंद मोदींना इतरांच्या मनातील मन की बात ऐकावी लागली, हेही नसे थोडके!
रेवंथ रेड्डींना का रोखले?
‘अब की बार ट्रम्प सरकार’ म्हणून आपल्या पंतप्रधानांनी कधीकाळी मिठ्या मारलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या ‘डिअर फ्रेंड’च्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर असो की टॅरिफ, प्रत्येक मुद्दय़ावरून ट्रम्पतात्यांनी मोदी यांची फजिती केली आहे. तीही आंतरराष्ट्रीय मंचावर. मोदींच्या चुकीच्या परराष्ट्रनीतीमुळे अमेरिकेत कधीनव्हे इतका भारतविरोधी माहौल आहे. देशाच्या पंचाहत्तर वर्षांच्या इतिहासात जे झाले नाही ते मोदींनी चुकीच्या धोरणांनी करून दाखविले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना अमेरिका दौरा करू नका, असे मोदी सरकारने सांगितले. त्यामुळे रेड्डींना हा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे मोदी व ट्रम्प यांच्या संबंधांवर पुन्हा चर्चा झडू लागल्या आहेत. कोणत्याही मुख्यमंत्र्यांना विदेश दौऱ्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते व ते देशहिताचे विषय लक्षात घेता योग्यही आहे. या परवानगीनुसार रेड्डी सुरुवातीला इंग्लंडला गेले. तिथला दौरा पार पाडून ते अमेरिकेला निघणारच इतक्यात ‘डोंट गो.’ असा दिल्लीतून निरोप आला. कधीकाळी याच अमेरिकेने मोदींनाही बॅन केले होते. मात्र, रेड्डींना अमेरिका दौऱ्याला जाण्यापासून का रोखण्यात आले त्याची रंजक माहिती पुढे आली आहे. या नियोजित दौऱ्यात रेड्डी हे न्यूयॉर्कचे महापौर जोहरदान ममदानी यांची भेट घेणार होते. त्याचबरोबर ते ट्रम्प यांचे चिरंजीव ट्रम्प ज्युनियर यांचीही भेट घेणार होते. या दोन्ही भेटी दिल्लीकरांच्या गळ्याखाली उतरणाऱया नव्हत्या. त्यामुळे साहजिकच रेड्डींना अमेरिकेस जाण्यास मज्जाव करण्यात आला. ट्रम्पतात्या हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठे ट्रम्प टॉवर उभारत आहेत. आता बहुदा तिथेच रेवंथ रेड्डींना ट्रम्प ज्युनियर यांची भेट घ्यावी लागेल.
आरक्षणाविरोधी आंदोलन
देशभरात एकीकडे आरक्षणासाठी आंदोलने सुरू असताना देशातील आरक्षण समूळ नष्ट करावे, यासाठी राजधानीत ऐतिहासिक जंतर मंतरवर आंदोलन झाले. मुख्य म्हणजे हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने झाले. सोशल मीडियावरून आवाहन केल्यानंतर जंतर मंतरवर उत्स्फूर्त गर्दी उसळली होती. यातील बहुतांश वर्ग हा सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर नाराज असलेला होता. विशेषतः यूजीसीबाबत माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो खेळखंडोबा केला त्याबद्दल संतापाची भावना असणारा होता. सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर अजित भारती यात आघाडीवर होते. त्यांच्या आवाहनानुसार हजारोंच्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतरवर ‘आरक्षण हटाओ देश बचाओ’चा नारा देत होते. मात्र, सोशल मीडियावर या आंदोलनाने यशाचा उच्चांक गाठला असला तरी मेन स्ट्रीम मीडियात हे आंदोलन झळकू शकले नाही. नेमके आंदोलनाच्याच दिवशी राहुल गांधी संसद मार्गावरील पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले. जंतर मंतरवरील लाठीमाराच्या कारवाईबाबत ‘एफआयआर’ नोंदवावा, अशी मागणी करत राहुल यांनी दिवसभर आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला यशही मिळाले. मात्र, सायंकाळपर्यंत चाललेले आरक्षणविरोधी आंदोलन मात्र त्यामुळे झाकोळले गेले. वर्षानुवर्षे भाजपची पाठराखण करत असलेला सवर्ण वर्ग हळूहळू भाजपच्या विरोधात जातो आहे, हे या आंदोलनाने दाखवून दिले.






























































