पुरातत्व डायरी – दिल्लीचा सांस्कृतिक इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. आशुतोष पाटील

दिल्लीच्या नागरी आणि सांस्कृतिक उक्रांतीचा पुरातत्त्वीय अभिलेख मानला जाणारा पुराणा किल्ला. या वास्तूच्या खाली दडलेल्या पुरातत्त्वीय थरांमधून दिल्लीच्या सांस्कृतिक प्रवासाचे विविध टप्पे उलगडतात.

दिल्लीच्या प्रदीर्घ इतिहासाचा अभ्यास करताना पुराणा किल्ला हे अत्यंत महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ ठरते. ‘ओल्ड फोर्ट’ म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला दिल्लीतील मथुरा रोडवर, यमुना नदीच्या प्राचीन प्रवाहाच्या परिसरात वसलेला आहे. पुराणा किल्ला सुमारे 710 मीटर उत्तर-दक्षिण लांब आणि 350 मीटर पूर्व-पश्चिम रुंद अशा मोठय़ा पुरातत्त्वीय टेकडीवर उभा आहे. या टेकडीचा परिघ सुमारे 2 किलोमीटर असून तिची सरासरी किमान उंची 11 मीटर आहे. या स्थळाची ओळख प्राचीन इंद्रप्रस्थ नगरीशी केली जाते आणि त्यामुळेच ते ‘पांडवों का किला’ या नावानेही परिचित आहे. मात्र, आज दिसणारी किल्ल्याची तटबंदी आणि वास्तू प्रामुख्याने 16व्या शतकातील आहेत. हुमायूनने सुमारे इ.स. 1533 मध्ये येथे दिनपनाह या शहराची स्थापना केली होती. त्यानंतर शेरशाह सूरीने दिनपनाहची पुनर्रचना करून इ.स. 1538 ते 1545 दरम्यान विद्यमान किल्ल्याच्या तटबंदीचा आणि वास्तुरचनेचा मोठा भाग उभारला.

पुराणा किल्ल्याचे महत्त्व केवळ त्याच्या भव्य मध्ययुगीन वास्तूंमध्ये नाही, तर त्या वास्तूंच्या खाली दडलेल्या पुरातत्त्वीय थरांमध्ये आहे. उत्खननातून या टेकडीवर मौर्यपूर्व काळापासून मुघल काळापर्यंत मानवी वस्तीचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मृद्भांडी, वास्तू अवशेष, नाणी, मुद्रा, टेराकोटाच्या मूर्ती, मणी, धातूच्या वस्तू आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक वस्तूंच्या आधारे या स्थळाचा प्रदीर्घ सांस्कृतिक इतिहास स्पष्ट होतो. त्यामुळे पुराणा किल्ला हा दिल्लीच्या नागरी आणि सांस्कृतिक उक्रांतीचा पुरातत्त्वीय अभिलेख मानता येतो. डॉ. स्वर्णकार आणि डॉ. बाल यांच्या अभ्यासातून पुराणा किल्ल्याच्या उत्खननात उलगडलेल्या सांस्कृतिक स्तरांच्या आधारे दिल्लीच्या प्रदीर्घ सांस्कृतिक प्रवासाचे विविध टप्पे स्पष्ट होतात.

पुराणा किल्ल्यावर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने यापूर्वी दोन प्रमुख टप्प्यांत उत्खनन केले होते. पहिले चाचणी उत्खनन इ.स. 1954-55 मध्ये करण्यात आले, तर त्यानंतर इ.स. 1969-70 ते 1972-73 या कालावधीत व्यापक उत्खनन करण्यात आले. या उत्खननात मौर्य काळापासून मुघल काळापर्यंत विविध सांस्कृतिक स्तरांचे पुरावे मिळाले. मौर्यकालीन स्तरातून टेराकोटाचे मणी आणि खेळणी, शुंगकालीन टेराकोटाची यक्षमूर्ती, कुषाणकालीन टेराकोटाचे नवसाचे/ प्रतीकात्मक कुंड, तांब्याची नाणी, गुप्तकालीन मुद्रा व नाणी, तसेच स्फटिक आणि कार्नेलियनचे मणी प्राप्त झाले. राजपूतकालीन वालुकाश्म (एaह्दूहा) दगडातील विष्णूची प्रतिमाही आढळली. सुलतानकालीन ग्लेझ्ड मृद्भांडी व नाणी तसेच मुघलकालीन चिनी पोर्सिलीन, काचेच्या बाटल्यांचे अवशेष आणि सोन्याचे कानातले यांसारख्या वस्तूही या पूर्वीच्या उत्खननांत मिळाल्या होत्या.

यापूर्वीच्या उत्खननांमुळे पुराणा किल्ल्याची पुरातत्त्वीय क्षमता स्पष्ट झाली असली तरी त्याच्या सर्वात जुन्या मानवी वस्तीबाबत महत्त्वाचे प्रश्न शिल्लक होते. विशेषत मौर्यपूर्व स्तर किती प्राचीन आहे, त्याची सांस्कृतिक वैशिष्टय़े कोणती आहेत आणि पेंटेड ग्रे वेअर या मृद्भांडी परंपरेचा या स्थळाशी नेमका संबंध काय आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने नव्या उत्खनन मोहिमा सुरू केल्या.

डॉ. वसंत कुमार स्वर्णकार यांच्या नेतृत्वाखाली इ.स. 2013-14 आणि 2017-18 या क्षेत्रीय हंगामात नव्याने उत्खनन करण्यात आले. त्यानंतर इ.स. 2022-23 मध्येही उत्खनन झाले. या उत्खननांचे उद्दिष्ट केवळ अवशेष बाहेर काढणे नव्हते. विविध सांस्कृतिक स्तरांतून निरपेक्ष आणि सापेक्ष कालमापनासाठी नमुने गोळा करणे, सर्वात जुनी मानवी वस्ती शोधणे आणि नैसर्गिक मातीपर्यंत पोहोचणे, पेंटेड ग्रे वेअरला स्पष्ट स्तरितसंदर्भात ओळखणे आणि विविध कालखंडांतील वास्तू उघड करून त्यांचे शैक्षणिक उद्देशाने जतन करणे ही प्रमुख उद्दिष्टे होती.

या उत्खननातून पुराणा किल्ल्यावर नऊ सांस्कृतिक कालखंडांची स्तरित मालिका ओळखण्यात आली आहे. त्यात मौर्यपूर्व, मौर्य, शुंग, कुषाण, गुप्त, गुप्तोत्तर, राजपूत, सुलतानकालीन आणि मुघल हे कालखंड आहेत. अहवालात मौर्यपूर्व स्तराचा कालक्रम इ.स.पू. 540-323, मौर्य काळ इ.स.पू. 323-200, शुंग काळ इ.स.पू. 200 ते सामान्य युगाच्या प्रारंभापर्यंत, कुषाण काळ सामान्य युगाच्या प्रारंभापासून इ.स. 200 पर्यंत, गुप्त काळ इ.स. 200-400, गुप्तोत्तर काळ इ.स. 400-600, राजपूत काळ इ.स. 600-1200, सुलतान काळ इ.स. 1200-1500 आणि मुघल काळ इ.स. 1600-1800 असा दिला आहे. या उत्खननाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुराणा किल्ल्याची स्तररचना अर्थात स्ट्रटिग्राफी. टेकडीच्या उताराच्या भागात सुमारे 14 मीटरपर्यंत मानवी वस्तीशी संबंधित पुरातत्त्वीय थर उघड करण्यात आले. त्यामुळे अद्याप नैसर्गिक मातीचा स्तर गाठलेला नाही. हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे, कारण याचा अर्थ या टेकडीवरील मानवी वस्तीची सर्वात सुरुवातीची अवस्था अद्याप उत्खननाच्या कक्षेत पूर्णपणे आलेली नाही.

पुराणा किल्ल्याच्या उतारावरील वरच्या थरांमध्ये आधुनिक काळातील मानवी वस्तीचेही पुरावे मिळाले आहेत. 1947 नंतर येथे वास्तव्यास आलेल्या लोकांच्या वस्तीशी संबंधित विटा आणि चिनी मातीच्या भांडय़ांचे तुकडे आढळले. त्याखाली मुघलकालीन सामग्री, त्यानंतर सुलतानकालीन वास्तू आणि पुढे राजपूत, गुप्तोत्तर, गुप्त, कुषाण, शुंग आणि मौर्यकालीन स्तर आढळले. मौर्यपूर्व स्तराखाली पिवळसर गाळाचा एक महत्त्वपूर्ण थर सापडला असून तो संभाव्य जलमग्नतेचा पुरावा असावा, असा अंदाज उत्खनन अहवालात व्यक्त केला आहे. त्याच्या आसपासच्या फिकट पिवळ्या आणि करडय़ा रंगाच्या मातीच्या थरांमध्ये पेंटेड ग्रे वेअरेंची मृद्भांडी आढळली आहेत.

मौर्यपूर्व स्तरातील पेंटेड ग्रे वेअरचा शोध हा अलीकडील उत्खननातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. या स्तरांमधून पेंटेड ग्रे वेअरच्या मृद्भांडय़ाचे तुकडे आणि एका वाडग्याचा किंवा ताटाचा तुटलेला भाग आढळला. त्याचबरोबर काळसर आणि लाल मातीच्या भांडय़ांचे तुकडेही मिळाले. या मौर्यपूर्व स्तरातील काही सेंद्रिय नमुन्यांचे ँाta Aहत्ब्tग्म् थ्aंदूदब्, इत्दग्da येथे परीक्षण करण्यात आले. त्यातून इ.स.पू. 540 पर्यंतची तारीख प्राप्त झाल्याचे उत्खनन अहवालात नमूद आहे. त्यामुळे पुराणा किल्ल्यावरील मानवी वस्तीचा पुरावा मौर्यपूर्व काळापर्यंत मागे नेता येतो. पेंटेड ग्रे वेअर आणि महाभारत यांचा संबंध हा भारतीय पुरातत्त्वातील चर्चेचा महत्त्वाचा विषय राहिला आहे. बी. बी. लाल यांच्या हस्तिनापूर येथील उत्खननात पेंटेड ग्रे वेअरचे पुरावे सर्वात खालच्या सांस्कृतिक स्तरांमध्ये मिळाले होते. त्याचबरोबर पाण्याखाली बुडाल्याचे पुरावेही आढळले. या पार्श्वभूमीवर पेंटेड ग्रे वेअरचा संस्कृतीचा संबंध महाभारताशी संबंधित कालखंडाशी जोडण्यात आला. पुराणा किल्ल्यावरही मौर्यकालीन स्तराखाली पेंटेड ग्रे वेअर आढळले असून त्याखाली संभाव्य जलमग्नतेचा थर आहे. मात्र, या पुराव्याचा अर्थ पुराणा किल्लाच महाभारतातील इंद्रप्रस्थ आहे, असा होत नाही. या स्थळाने दिल्लीच्या इतिहासातील अनेक सांस्कृतिक टप्पे आपल्या मातीमध्ये जतन करून ठेवले आहेत. उत्खननातून मिळालेली नऊ स्तरांची सांस्कृतिक मालिका दिल्लीच्या दीर्घकालीन वस्तीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबद्दल जाणून घेऊया पुढच्या लेखातून.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
[email protected]