Asian Games 2026 – हिंदुस्थानच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का; ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे नीरजने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या पदकाच्या आशांना सुरूंग लागला आहे. गेल्या स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते, त्यामुळे यंदाच्या त्याच्याकडून तशाच कामगिरीचा अपेक्षा होती. मात्र दुखापतीमुळे आपण या स्पर्धेतून माघार घेत असल्याची माहिती नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

लुसान डायमंड लीग 2026 मध्ये 88.05 मीटर भाला फेकून लयीत आलेल्या नीरज चोप्रा याने स्पर्धेदरम्यान आपल्या घोट्याला दुखापत झाल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण उर्वरित मोसमात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. फॉर्मात आल्यानंतर अशी दुखापत होणे निराशाजनक आहे. मात्र दुखापती हा खेळाचाच एक भाग असून आपण पूर्ण तंदुरुस्त होऊन पुनरागमन करू असा विश्वास नीरजने व्यक्त केला.

दरम्यान, यंदाचे वर्ष नीरजसाठी संमिश्र असेच राहिले. ग्लासगो येथील स्पर्धेत त्याने पोडियम फिनिश केले होते, परंतु श्रीलंकेच्या रुमेश पथिरागेने 89.75 मीटरचा थ्रो करत अव्वल स्थान पटकावले होते. लुसाने येथील कामगिरीनंतर नीरज 2026 मधील पुढील स्पर्धांसाठी सज्ज होत असतानाच दुखापतीने त्याला आशियाई क्रीडा स्पर्धांसह संपूर्ण हंगामाला मुकावे लागत आहे.

रोहित यादववर मदार

नीरजच्या अनुपस्थितीत आता आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या आशा युवा भालाफेकपटू रोहित यादववर टिकून असणार आहेत. रोहितने नुकत्याच भुवनेश्वर येथे पार पडलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर स्पर्धेत 87.68 मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे आता जपानमध्ये रोहितवर हिंदुस्थानची मदार असणार आहे.