वेब न्यूज – झाडच सांगणार पाण्याची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

शेतीला किती पाणी द्यायचे, याचा निर्णय आता केवळ जमिनीतील ओलाव्यावरून नव्हे, तर झाडाची स्थिती थेट जाणून घेता येणार आहे. संशोधकांनी पिकांच्या पानांवर किंवा खोडावर बसवता येतील असे स्मार्ट सेन्सर विकसित करण्याच्या दिशेने मोठी प्रगती केली आहे. हे सेन्सर झाडातील पाण्याचा प्रवाह, ओलावा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा ताण सतत मोजू शकतात. त्यामुळे पीक कोमेजून जाण्यापूर्वीच शेतकऱ्याला त्याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

अलीकडे विकसित करण्यात आलेल्या एका अतिशय हलक्या सेन्सरमध्ये लवचिक रचना वापरण्यात आली असून तो भाताच्या रोपाला सहज जोडता येतो. हा सेन्सर झाडातील रसाचा प्रवाह आठ आठवडय़ांपर्यंत सतत नोंदवू शकला. या माहितीच्या आधारे पिकावर दुष्काळाचा ताण आहे का? याचा अंदाज घेण्यात आला. विशेष म्हणजे या पद्धतीने दुष्काळाचा ताण ओळखण्याची अचूकता 93.22 टक्के होती, तर केवळ जमिनीतील ओलावा मोजणाऱया पारंपरिक पद्धतीची अचूकता 57.69 टक्के होती.

अमेरिकेतील संशोधकांनी याच दिशेने आणखी एक सेन्सर विकसित केला असून तो झाडातील सॅपमधील ग्लुकोज आणि पाण्याच्या कमतरतेशी संबंधित रासायनिक बदल मोजू शकतो. मक्याच्या रोपांवर केलेल्या प्रयोगात पाणी कमी झाल्यावर या बदलांची नोंद घेणे शक्य झाले. सेन्सरमधून मिळणारी माहिती स्मार्टफोनवरही गोळा करता येते.

या तंत्रज्ञानामुळे भविष्यात प्रत्येक रोपाची स्वतंत्रपणे गरज ओळखून नेमके पाणी देणारी स्वयंचलित सिंचन व्यवस्था तयार होऊ शकते. त्यामुळे पाण्याची बचत, पिकांचे नुकसान कमी करणे आणि उत्पादन वाढवणे शक्य होईल. शेतात हजारो रोपे असताना प्रत्येक झाडाची अवस्था माणसाने तपासणे अशक्य आहे. स्मार्ट सेन्सर मात्र हे काम सतत करत राहू शकतात. त्यामुळे शेतीमध्ये ‘झाड काय सांगतेय’ हे थेट ऐकण्याच्या दिशेने तंत्रज्ञानाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे हवामान बदलाच्या काळात पिकांचे संरक्षण आणि पाण्याचे नियोजन अधिक अचूकपणे करता येणार आहे.