
लंडन: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या जीवाला तुरुंगात धोका असून त्यांना तिथेच मारण्याचा कट रचला जात असल्याची भीती त्यांचे मुले, सुलेमान आणि कासिम यांनी व्यक्त केली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आथरटन यांनी ‘स्काय स्पोर्ट्स’साठी घेतलेल्या १८ मिनिटांच्या मुलाखतीत खान यांच्या मुलांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
या मुलाखतीत बोलताना कासिमने सांगितले की, इम्रान खान यांना शक्य तितका वेळ तुरुंगात ठेवून कायमचे गप्प करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. सद्यस्थिती पूर्वीपेक्षा अधिक भयंकर असून, इम्रान खान यांना दिवसातील २३ तासांहून अधिक वेळ कोठडीत एकाकी ठेवले जात आहे. खान यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी नातेवाईकांशी बोलताना तुरुंगातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगत, इतर राजकीय कैद्यांच्या तुरुंगातील मृत्यूचा दाखला देत स्वतःच्या जीवाला असलेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
तुरुंगातील वैद्यकीय उपचारांवरही मुलांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याऐवजी त्यांना केवळ काही तासांसाठी सरकारी वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले आणि पुन्हा थेट तुरुंगात पाठवण्यात आले. निष्पक्ष आणि त्रयस्थ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी का होऊ दिली जात नाही, प्रशासन नक्की काय लपवत आहे, असा सवाल सुलेमानने उपस्थित केला.


























































