वडिल त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले अन…; नेपाळमधील महापुरात हिंदुस्थानी वंशाचे दाम्पत्य बेपत्ता, लेकींची मदतीसाठी आर्त हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडिलांचा ६० वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा व्हावा म्हणून कैलास मानसरोवर यात्रेची वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गेलेले हिंदुस्थानी वंशाचे दाम्पत्य नेपाळ-तिबेट सीमेवरील भीषण महापुरात बेपत्ता झाले आहे. अमेरिकन नागरिकत्व आणि ‘ओसीआय’ कार्डधारक असलेले दीपक अहुजा आणि त्यांच्या पत्नी मधू अहुजा हे या दुर्घटनेत अडकले असून त्यांच्या मुलींनी पालकांना सुखरूप शोधून काढण्यासाठी आर्त साद घातली आहे.

नेपाळ-तिबेट सीमाभागात हिमनदी फुटल्यामुळे आलेल्या अचानक महापुरात आणि दरडी कोसळून आतापर्यंत ४६९ जणांचा मृत्यू झाला असून १,४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. यामध्ये अहुजा दाम्पत्याचाही समावेश आहे.

वाढदिवसाचे स्वप्न ठरले अखेरचे संकट

दीपक अहुजा यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या आध्यात्मिक यात्रेला जायचे ठरवले होते. ‘इशा सेक्रेड वॉक्स’ आणि ‘ट्रेकर्स सोसायटी’च्या ग्रुपसोबत ते अमेरिकेतून आले होते. तिबेटमधील सागा येथे सदगुरू यांची भेट झाल्यानंतर हे दाम्पत्य परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र, नेपाळ-तिबेट सीमेवरील ‘क्यिरॉंग’ (Gyirong) इमिग्रेशन पोस्टवर पोहोचताच काही मिनिटांत निसर्गाने रौद्ररूप धारण केले. ढगफुटीसदृश पाऊस आणि हिमनदीच्या पुरामुळे रस्ते, वीज आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

‘फाइंड माय’ ॲपवरील लोकेशन अचानक थांबले

या दाम्पत्याच्या कन्या श्रेया आणि आशना यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या वेळेनुसार सकाळी ९ वाजता त्यांचे पालक क्यिरॉंग पोस्टवर होते. तेथे पोहोचल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पुराचा प्रचंड लोंढा धडकला. आयफोनच्या ‘फाइंड माय’ ॲपद्वारे मुलींना त्यांचे लोकेशन दिसत होते, परंतु पूर आल्यानंतर संपर्क तुटला आणि लोकेशनची हालचाल पूर्णपणे थांबली.

मुलींचे भावूक आवाहन

श्रेया आणि आशना यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “वडिलांचा ४ ऑगस्ट रोजी ६० वा वाढदिवस होता. कैलास मानसरोवरला जाणे हे त्यांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये होते. बेपत्ता होण्यापूर्वी झालेल्या संभाषणात ते खूप आनंदी होते. आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. ते या संकटातून नक्की बाहेर पडतील असा आम्हाला विश्वास आहे.” अहुजा कुटुंबीय सध्या आंतरराष्ट्रीय दूतावास आणि स्थानिक बचाव पथकांच्या संपर्कात असून, कोणालाही आपल्या पालकांबाबत माहिती मिळाल्यास तातडीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.