
देशभरात राखीपौर्णिमेची धूम सुरू असताना उत्तर प्रदेशमधील बरेली येथे धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. बरेली क्लबच्या मेला मैदानावर गुरुवारी आयोजित सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊन 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. हा कार्यक्रम बरेलीचे महापौर उमेश गौतम यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता.
बरेलीतील छतीपूर भागातील रहिवासी असलेल्या मधू सिंग (वय – 45) असे मृत महिलेचे नाव आहे. मधू परिसरातील इतर महिलांसोबत या कार्यक्रमाला गेल्या होत्या. तिथे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि गर्दीत चिरडल्यामुळे मधू यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती खालावल्याने नंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मधू यांचा मेहुणा अनेश सिंग यांनी दिली आहे.
मधू यांच्या पश्चात दोन लहान मुले आणि पती आहेत. पती भगवान सिंग हे माजी सैनिक असून त्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला आहे, तसेच कुटुंबाने या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
In UP’s Bareilly, a woman identified as Madhu died allegedly due to “stampede” at “Rakshabandhan event” hosted by BJP leader and Bareilly Mayor Umesh Gautam. One of the relatives of the victim claims she barely survived the stampede at the event. pic.twitter.com/p0fLXguZUz
— Krishna Chaudhary (@KrishnaTOI) August 28, 2026
दरम्यान, या कार्यक्रमात सुमारे 20 हजार महिला उपस्थित होत्या. संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो शूटिंग झाले असून असा कोणताही अपघात घडलेला नाही. मीडियाद्वारेच मला या मृत्यूबाबत माहिती मिळाली. ही महिला कार्यक्रमाला आली होती की नाही, हेही अस्पष्ट आहे. संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला. या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. मात्र, वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या आरोपांची चौकशी केली जाईल, असे बरेलीचे सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम यांनी म्हटले.




























































