मळगंगा मंदिरातील चोरीचा तपास कागदावरच! निघोज ग्रामस्थ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरटय़ांनी 54 हजार रुपयांची लूट केली आहे. ही चोरी होऊन आठ दिवस उलटून गेले, तरी अद्यापही चोरटय़ांचा मागमूस लावण्यात पारनेर पोलिसांना अपयश आले आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत चोरीचा तपास न लागल्यास मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व निघोज ग्रामस्थ आंदोलन करतील. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी पारनेर पोलिसांची राहील, असा इशारा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ तसेच ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत पारनेरचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, माजी सरपंच ठकाराम लंके, सचिव शांताराम कळसकर, संघटक मंगेश वराळ, विश्वस्त रोहिदास लामखडे, अनिल शेटे, ऍड. ज्ञानेश्वर लामखडे, अनिल लंके आदी उपस्थित होते.

जगप्रसिद्ध रांजणखळगे व मळगंगा तीर्थक्षेत्र यांचा राज्यात नावलौकिक आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविक व जगप्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात. या ठिकाणी मळगंगा देवीचे मंदिर असून, 20 ऑगस्ट रोजी मंदिरात चोरटय़ांनी दानपेटी फोडत 54 हजार रुपये लुटले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे दीड तास चोरी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.

याबाबत ट्रस्ट सचिव शांताराम कळसकर यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद आणि सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. मात्र, अद्यापही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आता आमच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, पारनेरचे पोलीस किती अकार्यक्षम आहेत, हेच यातून सिद्ध झाले आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत चोरीचा तपास न लागल्यास ‘रास्ता रोको’, ‘गाव बंद’ उपोषण करून शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ट्रस्ट व ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद व ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.

लवकरच चोरीचा तपास लावणार

पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले की, ग्रामस्थ व भाविक यांच्या भावना तीव्र आहेत. याबाबत अनेक निवेदने आम्हाला उपलब्ध झाली आहेत. पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर व कार्याध्यक्ष दत्ता उनवने तसेच सर्व पत्रकार यांनीसुद्धा निवेदन दिले आहे. चोरटय़ांचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, लवकरच या चोरीचा तपास लावून आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.