
शंभर कोटींच्या निधीतून शहरात रस्ते करण्यात आले. महायुतीच्या नेत्यांनी फलकबाजी करून याचे पुरेपूर श्रेय घेतले; पण पावसाचे प्रमाण कमी असतानाही या रस्त्याचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. टक्केवारीमुळेच शहर पुन्हा खड्डय़ात गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रस्त्यातील या खड्डय़ात झाडे लावून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महानगरपालिका प्रशासनासह टक्केवारीतील लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध करण्यात आला.
शहरात वर्षभरात शेकडो कोटी निधी रस्त्यांसाठी आला. याबाबत स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी ही केली; पण शहरातील प्रत्येक चौकाचौकात रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. पावसामुळे तर काही महिन्यांपूर्वी केलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. या खड्डय़ांमुळे अपघात, तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. तरीदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. एवढे कोटी रस्त्यावर खर्च करूनसुद्धा रस्ते खराब कसे?, ते पैसे कोणाच्या खिशात गेले, असा सवाल करत, कोल्हापूर शिवसेना शहर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी परिसरात रस्त्यावरील खड्डय़ांत झाडे लावून आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, टक्केवारी व भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विराज पाटील, मंजीत माने, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, दीपक गौड, दिनेश साळोखे, सानिका दामूगडे, राजेंद्र जाधव, शौनक भिडे, चैतन्य देशपांडे, राजू सांगावकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


























































