नेपाळमधील धोका अजून टळलेला नाही, पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; चीनचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिबेटमधील भूस्खलन आणि भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली. पुरात आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. मात्र या महाप्रलयानंतरही नेपाळमधील धोका अद्याप टळला नाही. नेपाळसाठी पुढील तीन दिवस आणखी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

नेपाळमध्ये चोचेन खोला आणि पुरपू त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ एक मोठे जलाशय तयार झाले असून, गुरुवार सकाळपर्यंत त्यात अंदाजे 20 लाख घनमीटर पाणी साचले आहे आणि हे जलाशय आधीच ओसंडून वाहत आहे. पुढील तीन दिवसांत या जलाशयात आणखी 30 लाख घनमीटर पाणी येण्याची शक्यता असून, त्यामुळे जलाशय फुटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने दिला आहे.

पुराची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयाचे पथक आणि काठमांडू व बीजिंग येथील हिंदुस्थानी राजदूत उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, मदत आणि बचाव कार्य, तसेच पूरग्रस्त भागातील लोकांच्या सुरक्षेवर चर्चा झाली.