
दिवसभर रिल्स पाहणे, फोनचे सतत येणारे नोटिफिकेशन्स आणि वाढलेला स्क्रीन टाईम यांमुळे अनेकजण मानसिकदृष्ट्या थकतात. फोन आणि स्क्रीनच्या या सवयीपासून ब्रेक घेण्यासाठी सध्या ‘नो नेटवर्क, नो नोटिफिकेशन’ ही एक नवी ट्रॅव्हल थेरपी म्हणून लोकप्रिय होत आहे. जर तुम्हालाही मोबाईल आणि डिजिटल विश्वापासून दूर जाऊन शांततेत काही दिवस घालवायचे असतील, तर हिंदुस्थानातील या प्रमुख ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.
तिर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश
शिमला आणि मनालीसारख्या गजबजलेल्या ठिकाणांपासून दूर शांततेत वेळ घालवण्यासाठी तिर्थन व्हॅली हा एक उत्तम पर्याय आहे. येथील निसर्गरम्य गावांमध्ये फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या खोऱ्यातील अनेक भागांमध्ये मोबाईलची कनेक्टिव्हिटी खूपच कमी किंवा मर्यादित असते. ३ दिवसांच्या ट्रिपसाठी हे ठिकाण योग्य असून सप्टेंबर ते नोव्हेंबर हा येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो.
झिरो व्हॅली, अरुणाचल प्रदेश
ईशान्य हिंदुस्थानातील अतिशय सुंदर ठिकाणांपैकी एक असलेली झिरो व्हॅली तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवून स्थानिक ग्रामीण जीवनशैली अनुभवता येते. हिंदुस्थानच्या शेतांमधून फिरणे, ताली व्हॅली वाईल्डलाईफ सँक्च्युरीला भेट देणे आणि सभोवतालच्या पर्वतांचे विहंगम दृश्य पाहणे मनाला शांतता देते.
चोपता, उत्तराखंड
उत्तराखंडमधील चोपता हे ठिकाण निसर्गसौंदर्यासोबतच तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला ट्रेकसाठी ओळखले जाते. मोठ्या शहरांमधील ट्रॅफिक, गोंगाट, बाजारपेठा आणि सतत वाजणाऱ्या फोनच्या रिंगटोनपासून हे ठिकाण खूप दूर आहे. काही भागात मोबाईल नेटवर्क अजिबात नसल्यामुळे डिजिटल डिटॉक्ससाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते.
स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश
अतिशय उंचावर वसलेला स्पिती व्हॅली हा थंड वाळवंटाचा प्रदेश आहे. सुंदर गावे, उंच पर्वत, बौद्ध मठ आणि निसर्गाचे अद्भुत रूप ही या ठिकाणाची वैशिष्ट्ये आहेत. रोजच्या घाईगडबडीच्या आयुष्यातून आणि डिजिटल जगातून पूर्णपणे कट-ऑफ होण्यासाठी ही जागा परफेक्ट आहे.






























































