
वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना बसची रिक्षाला धडक बसल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून रिक्षाचाही चक्काचूर झाला. आंध्र प्रदेशातील पालनाडू येथे चिलकलुरिपेटजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, वेलुरू गावातील आठ जण प्रकाशम जिल्ह्यातील कोंडामंजुलूर येथे एका नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर सर्वजण रिक्षाने घरी परतत असताना हा अपघात झाला. विजयवाडाहून तिरुपतीला जाणाऱ्या खासगी बसने त्यांच्या रिक्षाला धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रिक्षातून जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बसच्या अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आला आहे. तपासाअंती अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

























































