
दिल्लीच्या टिळक नगर परिसरातील न्यू महावीर नगरमध्ये एका 21 वर्षीय तरुणीची तिच्याच भाड्याच्या घरात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्कान असे मृत तरुणीचे नाव असून, ती मॉडेलिंगसोबतच शिक्षणही घेत होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मुस्कान घरी एकटी असताना आरोपीने तिच्या घरात शिरकाव केला आणि तिच्यावर चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात मुस्कानला अनेक गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुस्कान ज्या जिममध्ये जायची, तेथील ट्रेनर असलेला ‘इम्रान’ या हत्येमागील मुख्य संशयित असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, इम्राननेच हा हल्ला केला आहे. मृत मुस्कानचा भाऊ ‘आकाश’ याने पोलीस आणि कुटुंबीयांना सांगितले की, इम्राननेच मुस्कानची हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस सध्या इम्रानचा माग काढत असून, तो लपलेल्या संभाव्य ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे.

































































