
आगोटा… पागोटा, पिंगा ग पोरी पिंगा, किस बाई किस, घागर घुमू दे, नाच ग घुमा अशा विविध पारंपरिक गाण्यांवर महिलांनी मंगळवारी ताल धरला. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मंगळागौर खेळांचे. मीरारोड येथील सेंट थॉमस चर्च हॉलमध्ये झालेल्या या मंगळागौर खेळ स्पर्धेला महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात महिलांनी आकर्षक बक्षिसांची लयलूट केली.
महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा संघटक निलम ढवण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. अनेक पारंपरिक वेशभूषा करून सांस्कृतिक नृत्य केले. या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांनी अक्षरशः धमाल केली. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मीरा-भाईंदर जिल्हा शाखेच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संघटक निलम ढवण यांनी केले. मोठ्या उत्साहात अनेक महिला ग्रुपनी सहभाग घेतला. यावेळी संपर्क संघटक रोशनी गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, विधानसभा संघटक सुप्रिया घोसाळकर, कांचन लाड, श्रेया साळवी, क्षमा गांधी, स्वाती देसाई, अस्मिता रोकडे, प्राची पाटील, शहर संघटक कल्पना शिगवण, दीपा म्हात्रे, शिवानी देसाई, शोभना दिनिस, उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील, सुभाष केसरकर, विनोद म्हात्रे, सदानंद घोसाळकर, विजय वाळंज, संतोष आंद्रे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विधानसभा संघटक हेमलता जोशी यांनी केले.
संस्कृतीची नव्या पिढीला ओळख
श्रावण महिन्यात महिलांसाठी अनेक महोत्सवांचे आयोजन केले जाते. समाज कितीही आधुनिक बनला तरी आपल्या संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या संस्कृतीची नव्या पिढीला ओळख होऊन या पिढीकडूनही सण आणि उत्सवांच्या संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे जिल्हा संघटक निलम ढवण यांनी सांगितले.































































