
अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा (एसआयआर) पुढील टप्पा आता निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेत पडताळणीदरम्यान मृत, स्थलांतरित, दुबार तसेच प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली अशी सुमारे 4 लाख 27 हजार 930 नावे मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, सन 2002च्या मतदारयादीशी जुळणी न झालेल्या तसेच मतदारयादीतील तपशिलात दुरुस्ती असलेल्या 5 लाख 58 हजार 846 मतदारांना नोटिसा बजावून पुरावे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
जिल्हा निवडणूक शाखेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, एसआयआर मोहिमेस देण्यात आलेली दुसरी मुदतवाढ संपल्यानंतर जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. आता प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती, दावे आणि पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 38 लाख 10 हजार 109 मतदारांची डिजिटलायझेशनच्या माध्यमातून पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत 1 लाख 41 हजार 212 मतदार मृत, 1 लाख 71 हजार 719 मतदार स्थलांतरित, तर 62 हजार 707 मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळून आले. याशिवाय 50 हजार 167 मतदार प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींची एकत्रित संख्या 4 लाख 27 हजार 930 इतकी असून, संबंधित नावे प्रारूप मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची मतदार संख्या आणि मतदान केंद्रांच्या रचनेतही मोठा बदल होणार आहे.
दरम्यान, मतदारयादीत नावे असली तरी सन 2002च्या मतदारयादीशी जुळणी न झालेल्या तसेच प्रपत्र भरून दिलेल्या 5 लाख 58 हजार 846 मतदारांना पुरावे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 69 हजार 116 मतदारांनी नाव, वय, पत्ता, छायाचित्र अथवा अन्य तपशिलात दुरुस्तीची मागणी केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित मतदारांना आपले नाव आणि मतदार म्हणून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करता येणार आहेत. या प्रक्रियेनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
सुनावणीसाठी 436 अधिकारी
नोटिसा बजावल्यानंतर होणाऱ्या सुनावणीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमधील 436 राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी मतदारांकडून सादर करण्यात येणारे पुरावे आणि कागदपत्रांची छाननी करून नियमानुसार निर्णय घेणार आहेत. नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी विहित मुदतीत आवश्यक पुरावे सादर करणे अपेक्षित आहे.
मतदान केंद्रांचीही फेररचना
एसआयआर प्रक्रियेमुळे मतदारांच्या संख्येत झालेल्या बदलाचा परिणाम मतदान केंद्रांच्या रचनेवरही झाला आहे. जिल्ह्यात यापूर्वी 3 हजार 830 मतदान केंद्रे होती. फेररचनेनंतर आता 3 हजार 881 मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये 57 नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून, पूर्वीची 35 मतदान केंद्रे लगतच्या केंद्रांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नव्या रचनेत एका मतदान केंद्रावर सुमारे 1 हजार 300 डिजिटायझेशन झालेल्या मतदारांची नावे राहतील, अशी रचना करण्यात आली आहे.


























































