
बोरीवली रेल्वे स्थानकात दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादात प्रवाशाला लाथ मारून लोकलबाहेर ढकलून दिल्याची घटना घडली. मोहंमद तौसिफ कलीम शेख असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी राहुलकुमार मनीष पांडे नावाच्या तरुणावर बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मोहंमद यांनी मंगळवारी गोरेगाव येथून नालासोपारा येथे जाण्यासाठी विरार स्लो लोकल पकडली. लोकलमध्ये जागा नसल्याने मोहंमद आणि त्याचा मित्र हे दोघे दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. लोकल कांदिवली स्थानकात आली तेव्हा एक जण दरवाजाजवळ उभा राहिला. त्यानंतर लोकल बोरिवली स्थानकात आली. तेव्हा मोहंमदने त्याला लोकलच्या डब्याच्या आत जागा आहे, आपण आतमध्ये या, बाकीच्या प्रवाशांना उतरू द्या, असे सांगितले. यावरून झालेल्या वादात मोहंमदला खाली ढकलण्यात आले.

























































