मोठ्या आजारांच्या उपचारासाठी मिळतेय मोठी आर्थिक मदत! मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टमधील करारामुळे गरजूंना फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व टाटा ट्रस्टमध्ये करार करण्यात आल्यानंतर आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्या गरजू रुग्णांना कर्करोग, यकृत प्रत्यारोपण आणि मेंदूवरील शस्त्रक्रियेसारख्या मोठ्या आजारांच्या उपचारासाठी मोठी आर्थिक मदत मिळत आहे.  या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील 9 गरजू रुग्णांना 89 लाख 60 हजार 301 रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक रुग्णांना महागडे उपचार घेणे शक्य होत नाही. अशा रुग्णांसाठी शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये समन्वय साधून उपचारासाठी मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे पैशांअभावी उपचार रखडण्याची शक्यता असलेल्या गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होत असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

150 गरजूंना मदतीचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात फेब्रुवारीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच करार असून, त्याअंतर्गत राज्यातील 150 गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

इतर संस्थांसोबत करार करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. टाटा ट्रस्टच्या धर्तीवर इतर नामांकित संस्थांसोबतही सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, हे करार पूर्ण झाल्यानंतर राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळेल, असे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.