
लोकल ट्रेनमध्ये वाढलेले वाद व त्यातून घडणाऱ्या हाणामारी, चाकूहल्ले तसेच लैंगिक अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालवा, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दोषींना वेळीच कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी जलदगती न्यायालयांत खटले चालवण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे.
मागील सहा महिन्यांत उपनगरी रेल्वेच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर हिंसाचाराच्या तीन मोठया घटना घडल्या. प्रवाशांमधील मारामारी आणि चाकू हल्ल्यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलच्या प्रचंड गर्दीच्या प्रवासात अशा घटना घडणे हे सुरक्षा यंत्रणांचे अपयश आहे. त्यामुळे 75 लाख लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रवाशांवर जरब बसवण्यासाठी लोकलमधील हिंसाचार व लैंगिक अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेतर्फे अध्यक्षा लता अरगडे, सरचिटणीस जितेंद्र विशे आणि वरिष्ठ सल्लागार मनोहर शेलार यांनी केली आहे.

























































