
कोल्हापूरचे वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठी ‘एसटीपी’ प्लाण्टची सोय गरजेची असताना आयुर्वेदिक औषधांचा ‘डोस’ देऊन तब्बल 12 कोटींचा ढपला पाडण्याचा घाट घातला गेला आहे. कोणीतरी सायंटिस्ट, लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमताने हा निधी हडपण्यासाठी ‘आयुर्वेद’च्या नावाखाली नवीन टेक्नॉलॉजी आणत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
‘बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आलेत की काय?’ असा उपरोधिक टोला लगावत, ‘जोपर्यंत रंकाळा बचाव समिती, प्रदूषणमुक्त करणारे जाणकार यांना या आयुर्वेदिक औषधाच्या यशस्वितेचे सादरीकरण अधिकारी दाखवत नाहीत, तोपर्यंत महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मलिदा खाण्यासाठी आम्ही काम करू देणार नाही,’ असा इशाराही इंगवले यांनी दिला.
रविकिरण इंगवले म्हणाले, कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सर्वांगीण विकासास आमचा विरोध नाही; पण विकासाच्या नावावर स्वतः ‘गब्बरसिंग’ व्हायचे स्वप्न लोकप्रतिनिधींनी पाहू नये. रंकाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात सांडपाणी, ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने रंकाळ्याचा तळ पूर्णपणे दूषित आहे. काही भागांत पुन्हा जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी मुळात स्वतंत्र एसटीपी प्लाण्टची सोय गरजेची असताना त्याऐवजी कोणीतरी सायंटिस्ट, लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी हे संगनमताने निधी हडपण्यासाठी आयुर्वेदाच्या नावाखाली नवीन टेक्नॉलॉजी आणत असल्याचा आरोप इंगवले यांनी केला. तसेच ‘आधी जनतेसमोर याचे यशस्वी सादरीकरण करा,’ असे आव्हान रविकिरण इंगवले यांनी दिले आहे.

























































