
आशियाई ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी दुहेरी सुवर्णझळाळी दाखवली. मयंक चक्रवर्ती आणि प्रतिती बोरदोलोई यांनी अनुक्रमे खुल्या आणि मुलींच्या गटात बाजी मारत हिंदुस्थानचा झेंडा उंचावला. अव्वल मानांकित मयंकने नऊ फेऱयांत 7.5 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले तर मुलींच्या गटात प्रतितीनेही 7.5 गुणांसह सुवर्णमुपुट पटकावला. खुल्या गटात रशियाच्या आर्टेम पिंगीनने रौप्य, तर हिंदुस्थानच्या दक्ष गोयलने कांस्य पदक जिंकले. मुलींमध्ये कझाकची मारिया खोल्याव्हकोला दुसरी तर हिंदुस्थानची निवेदिता तिसरी आली.
सुवर्णासोबत किताबांची बरसात
मयंकच्या विजेतेपदाला ग्रँडमास्टर नॉर्मची जोड मिळाली. तसेच दक्ष गोयलने फिडे मास्टर किताब आणि इंटरनॅशनल मास्टर नॉर्म पटकावला. प्रतितीने सुवर्णासोबत वुमन इंटरनॅशनल मास्टर किताब आणि वुमन ग्रँडमास्टर नॉर्म मिळवत दुहेरी धमाका केला. मारिया आणि निवेदितालाही डब्ल्यूआयएम नॉर्म मिळाला.
हिंदुस्थानचा दबदबा
क्लासिकल स्पर्धेतील सहापैकी चार पदके हिंदुस्थानच्या खेळाडूंनी जिंकली. दोन सुवर्ण आणि दोन कांस्यांसह हिंदुस्थानने पदकतालिकेत वर्चस्व गाजवले. रशिया आणि कझाकस्तानला प्रत्येकी एक रौप्य मिळवता आले. आशियाई बुद्धिबळ महासंघाचे सचिव हिशाम अल-ताहेर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


























































