
विद्यार्थ्यांनी बीए, बीएसएसी आणि बीकॉम पदवी पूर्ण केली म्हणजे त्यांना नोकरी मिळेल, असे नाही. नोकरी मिळवण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे संबंधित कौशल्य आवश्यक आहे, असे ठाम मत नीती आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
नीती आयोगाने नुकतेच विकसित भारत 2047 साठी कौशल्य विकासावर भर नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये देशाची उच्च आणि तांत्रिक शिक्षण प्रणाली, लेबर मार्पेटच्या बदलत्या गरजा यांच्यातील तफावतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. बहुतेक शैक्षणिक संस्थेकडे कालबाह्य अभ्यासक्रम आहेत. जे बदलत्या उद्योग गरजांशी जुळवून घेत नाहीत. परिणामी डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट नेहमीच नोकरीसाठी पात्रतेत ठरत नाहीत. या तरुणांकडे कौशल्य नसल्याने त्यांना नोकरी मिळवता येत नाही, असे या अहवालात म्हटले आहे.




























































