आधी निवृत्त होऊन धक्का दिला अन् आता थेट शाळेवरच दावा ठोकला, नेमकं कारण काय? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विल पुकोव्हस्की तरुण तडफदार फलंदाज होता ज्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळून जगभरात आपल्या फलंदाजीचा धडाका दाखवायला होता. मात्र, वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. तेव्हा त्याच्या निवृत्तीची जगभरात चर्चाही झाली. मात्र, तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याच्या शाळेवर खटला दाखल केल्यामुळे. शाळेच्या एका चुकीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घ्यावी लागल्याचा त्याने आरोप केला आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, विल पुकोव्हस्कीने मेलबर्नच्या ब्रायटन ग्रमार स्कूलवर खटला दाखल केला आहे. 2014 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन रूल्स फुटबॉलच्या ट्रेनिंग सेशनमध्ये पुकोवस्कीच्या डोक्याला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. मात्र, तरीरी त्याला थोड्याच वेळात पुन्हा सरावासाठी परवानगी देण्यात आली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना अंधुक दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर मला कधीही पूर्णपणे बरे वाटू शकले नाही, असे सांगत पुकोव्हस्की याने हीच घटना आपल्या आयुष्यातील एक दुर्दैवी वळण ठरल्याचे म्हटले आहे.

एक काळ असा होता की पुकोवस्की याला ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील स्टार मानले जात होते. मात्र, क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 13 वेळा ‘कन्कशन’चा (मेंदुला झालेली दुखापत) सामना करावा लागल्याने वैद्यकीय पॅनेलच्या सल्ल्यानुसार त्याला खेळाला रामराम ठोकावा लागला. त्याने हिंदुस्थानविरुद्ध 2021 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकमेव कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात 10 धावा केल्या होत्या.