Yavatmal News बाभळीवर चढला बिबट्या; कलगाव-सवना परिसरात दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाव तालुक्यातील कलगाव-सवना-पुसद मार्गावर बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ एका नागरिकाने कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सवना-कलगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिकांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. त्यातच आता बिबट्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ समोर आल्याने त्याच्या वावराला दुजोरा मिळाल्याची चर्चा परिसरात आहे.

ऊसशेती बनली बिबट्याचा ‘लपण्याचा अड्डा’?

कलगाव-सवना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे. दाट ऊस आणि झाडीमुळे बिबट्याला दिवसा लपण्यासाठी सुरक्षित आसरा मिळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

दरम्यान, वनविभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये तसेच बिबट्या आढळल्यास त्याचा पाठलाग किंवा त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्याच्या वावरामुळे परिसरात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.