Konkan News – अणुस्कुरा घाटात १४ चाकी ट्रक बंद; वाहतूक ठप्प, पोलिसांच्या प्रयत्नाने दुचाकी व छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अणुस्कुरा घाटात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारा सुमारे १४ चाकी ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने घाटमार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. ट्रक घाटातील अरुंद व अडचणीच्या ठिकाणी बंद पडल्याने वाहतूक सुरळीत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस तसेच अणुस्कुरा चेकपोस्टवरील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून दुचाकी तसेच अल्टो, वॅगनार यांसारख्या छोट्या चारचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र मोठ्या वाहनांना घाटातून मार्ग काढणे शक्य नसल्याने अनेक वाहने घाटातच अडकून पडली. यामध्ये राजापूर आगाराच्या एसटी बसचाही समावेश होता.
ट्रक सुरू करून तो सुरक्षितपणे बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र रात्रीच्या अंधारामुळे या कामात अडथळे निर्माण होत होते. बंद पडलेला ट्रक घाटातून हटविल्याशिवाय मोठ्या वाहनांची सुरक्षित वाहतूक पूर्ववत होणे शक्य नसल्याने काही काळ अणुस्कुरा घाटातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणारी मोठ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात अणुस्कुरा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी ओणी-अणुस्कुरा मार्गावर अवजड वाहनांचा ताण वाढला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अणुस्कुरा घाटाची सध्याची स्थिती चिंताजनक असल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. गणेशोत्सव काळात वाहनांची संख्या वाढणार असल्याने रस्त्याची दुरवस्था, अरुंद घाटमार्ग आणि वाढलेली अवजड वाहतूक यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.