
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याला हिंदुस्थानविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यामध्ये बेशिस्तपणा दाखवल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अधिकृतपणे फटकारले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल तो दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नेमकं घडलं तरी काय…
ही घटना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या सुमारास घडली होती. जेव्हा मानव सुथारने शेवटच्या चेंडूवर बाद केल्यानंतर जयसूर्याचा संयम सुटला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने रागाने आपली बॅट सीमारेषेच्या मार्परवर जोरात आपटली. आयसीसीच्या नियमांमधील कलम 2.2 नुसार ही कृती मैदानाच्या मालमत्तेचा गैरवापर मानली जाते.
1 डिमेरिट पॉइंट जोडला
आयसीसीने जयसूर्याला अधिपृत इशारा दिला आहे आणि त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट पॉइंटदेखील जोडला आहे. गेल्या 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा आहे. या प्रकरणासाठी सामना शुल्काच्या 50 टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंटची शिक्षा असते, पण यावेळी त्याला केवळ इशारा आणि एक डिमेरिट पॉइंट देऊन सोडून देण्यात आले.
सामन्याच्या पहिल्या दिवशी गैरशिस्तीची आणखी एक घटना घडली होती, जेव्हा यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात बाचाबाची झाली. या तणावामुळे, आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर सामना शुल्काच्या 25-25 टक्के दंड लावला होता आणि प्रत्येकी एक डिमेरिट पॉईंटही दिला होता.
जयसूर्याने चूक कबूल केली
जयसूर्याने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिलेली शिक्षा आणि आपली चूक कोणताही युक्तिवाद न करता मान्य केली. खेळाडूने आपली चूक कबूल केल्यामुळे या प्रकरणासाठी कोणतीही स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली नाही. मैदानातील पंच अहसान रझा आणि शरफुदुल्ला शाहिद, तसेच तिसऱया आणि चौथ्या पंचांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला.




























































