प्रज्ञानंद – कारुआना जेतेपदासाठी भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी बुद्धिबळाचा युवा तारा आर. प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूरच्या (जीसीटी) अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट किमरचा 19-9 असा एकतर्फी पराभव करत प्रज्ञानंदने अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे, तीन ब्लिट्झ सामने बाकी असतानाच त्याने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले हे विशेष. त्यामुळे आता अंतिम फेरीत प्रज्ञानंद आणि गतविजेता कारुआना यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

दुसऱया क्लासिकल सामन्यात किमरला नमवून प्रज्ञानानंदने 9-3 अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर रॅपिड सामन्यांतही त्याने आपली पकड कायम ठेवत उपांत्य फेरी जिंकली. त्यामुळे उर्वरित ब्लिट्झ सामन्यांचे निकाल केवळ औपचारिक ठरले. ब्लिट्झमध्ये मात्र किमरने जोरदार प्रतिकार केला. प्रज्ञानंदने पहिल्या ब्लिट्झमध्ये पराभवाच्या स्थितीतून मुसंडी मारत विजय मिळवला. मात्र, त्यानंतर किमरने सलग तीन सामने जिंकले. तरीही आधीच घेतलेल्या आघाडीमुळे अंतिम निकालावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि 19-9 असा विजय प्रज्ञानंदच्या नावावर राहिला.

पहिल्या डावात काळ्या मोहऱ्यांनी सुरुवात

अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या सोडतीत प्रज्ञानंदला पहिल्या क्लासिकल डावात काळय़ा मोहऱयांनी खेळावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. अंतिम फेरीत प्रथम दोन क्लासिकल सामने होतील. त्यानंतर नियमानुसार रॅपिड आणि ब्लिट्झच्या लढती रंगतील.

विजेत्याला दोन लाख डॉलर्स

‘जीसीटी’ फायनलची एकूण बक्षीस रक्कम 4 लाख 50 हजार डॉलर्स आहे. विजेत्याला तब्बल 2 लाख डॉलर्स, उपविजेत्याला 1 लाख 25 हजार डॉलर्स, तर तिसऱया क्रमांकाच्या खेळाडूला 75 हजार डॉलर्स मिळतील. याशिवाय अव्वल तीन खेळाडूंना 2027 ग्रँड चेस टूरचे थेट निमंत्रण मिळणार आहे.

कारुआनाशी बुद्धिबळाचा महासंग्राम

दुसऱया उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने वेस्ली सो याचा 18-12 असा पराभव केला. त्यामुळे आता अंतिम फेरीत प्रज्ञानंद आणि गतविजेता कारुआना यांच्यात थेट सामना रंगणार आहे. 25 ऑगस्टला होणाऱया या लढतीत दोघांची सुरुवात शून्य गुणांपासून होईल. कारुआना सलग दुसऱयांदा ‘जीसीटी’ विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी उतरणार आहे, तर प्रज्ञानंदचे लक्ष्य या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पहिले विजेतेपद पटकावण्याचे असेल.