सामना अग्रलेख – चर्चेची 25 वी फेरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे वारंवार सांगण्यात आले. आता ते दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्या आपली चिंता वाढवणाऱ्या आहेत अशा वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नक्की काय करतात? पाकिस्तानची भीती कायम आहे. 25 चर्चेच्या फेऱ्यांनंतरही चीनभारत सीमावाद पुढे सरकलेला नाही. भारताच्या सीमेवरील तणावात चीन, पाकिस्तानचा हात आहे. मि. डोवाल, चीनमध्ये हा हात मुळापासून उखडायला गेले असतील तर आनंदच आहे!

 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या (पुन्हा एकदा) चीनच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे राष्ट्राला म्हणजे नक्की कोणाला सल्ला देतात? त्यांच्या सल्ल्याने काय घडते? हे त्यांनाच माहीत, पण भाजपसाठी हे महाशय ‘जेम्स बॉण्ड’पेक्षा कमी नाहीत. त्यामुळे ‘धुरंदर’, ‘उरी’ वगैरेंसारख्या चित्रपटांच्या मालिकांत हे भारतीय जेम्स बॉण्डचे पात्र हमखास रंगवले जाते. ही सध्याची मौजच म्हणायला हवी. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चीनला गेले. मि. डोवाल यांची चीनचे परराष्ट्र मंत्री आणि विशेष प्रतिनिधी वांग यी यांच्यासोबत भारत-चीन सीमाप्रश्नावर ही 25 वी फेरी आहे. प्रश्न इतकाच आहे की, 25 फेऱ्या चर्चा होऊनही सीमावाद का सुटला नाही? उलट सीमावाद जास्तच जटिल आणि तणावपूर्ण होत चालला आहे. या काळात सीमावाद सुटला नाही, पण भारत-चीन व्यापाराचे आकडे मात्र वाढले व हे आकडे प्रचंड प्रमाणात चीनच्या फायद्याचेच दिसत आहेत. त्यामुळे मि. डोवाल हे चीनला सीमावाद सोडवायला जातात की चीनची अर्थव्यवस्था मजबूत करायला, त्यांचा व्यापार वाढवायला जातात? भारत व चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3,488 किलोमीटर आहे. 2020 मध्ये याच प्रश्नी गलवानमध्ये रक्तपात झाला. भारताचे 20 जवान चिन्यांकडून मारले गेले. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तेव्हा एखादे ‘ऑपरेशन सिंदूर’ करून चीनला मागे रेटण्याचा सल्ला का दिला नाही? पाकिस्तानवर फुरफुरणारे हे सल्लागार चीनच्या बाबतीत मात्र

दात काढलेल्या नागाप्रमाणे

वेटोळे घालून बसतात. ऑगस्ट 2025 मध्ये वांग यी भारतात आले तेव्हा चर्चेची 24 वी फेरी झाली. त्यानंतर चीनने 11 वेळा अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मते चिन्यांनी अरुणाचलच्या अनेक गावांवर कब्जा मिळवला आहे. लडाखच्या बाबतीत सोनम वांगचुक यांचे तेच म्हणणे आहे. चीनने लडाखमध्ये घुसून भारताची जमीन बळकावली आहे असे वांगचुक यांनी सांगताच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर वांगचुक यांना अटक केली गेली. त्यांच्यावर देशद्रोहासारखी कलमे लावण्यात आली. चीनबरोबरच्या चर्चेत मि. डोवाल या घुसखोरीचे मुद्दे लावून धरत असतील अशी अपेक्षा आहे. चीन हा काही भारताचा मित्र नाही. पाकिस्तानला भारतविरोधी मजबूत करण्यात चीनचे मोठे योगदान आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीनने पाकिस्तानला रसद पुरवून भारताची गोची केली हे सत्य मि. डोवालही नाकारू शकणार नाहीत. चीन भारतावर अप्रत्यक्ष आक्रमण आणि अतिक्रमण करत असतानाही भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात चीनची मोठीच आर्थिक  भरभराट घडवून आणली. भारत-चीन द्विपक्षीय व्यापार करार या काळात 151 अब्ज डॉलर झाला. भारताची चीनला निर्यात सुमारे 19.5 अब्ज डॉलर आणि चीनकडून आयात सुमारे 131.6 अब्ज डॉलर    म्हणजे या द्विपक्षीय व्यापार करारातही भारताला चीनने मागे टाकले. भारताची व्यापार तूट सुमारे 131.6 अब्ज डॉलरची आहे. भारताचे

आर्थिक शोषण

चीनकडून सुरू आहे. भारत-चीन सीमेवर तणाव वाढतो आहे, पण दोन देशांमधील व्यापार मात्र जोरात सुरू आहे. पाकडय़ांशी व्यापार करणारे, संबंध ठेवणारे देशद्रोही, पण चीनशी व्यापार करणारे, चर्चेच्या फेऱ्या करणारे मोठे मुत्सद्दी ठरवले जात आहेत. चीनकडून भारतात इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, रसायने, कच्चा माल मोठय़ा प्रमाणावर येतो. आता तर सणासुदीत पणत्या, दिवे, गणपतीच्या मूर्ती, देवीचे मुखवटे वगैरे सामान येत आहे. फळे व भाज्या येत आहेत. मग मोदींचे ‘मेड इन इंडिया, मेक इन इंडिया’ मिशनचे काय झाले? अंधभक्तांनी ‘चिनी मालावर बहिष्कार टाका, तीच राष्ट्रभक्ती’ असे बोंबलायचे व भारत सरकारने मात्र तोटा सहन करून चीनशी व्यापार करायचा हा आतबट्टय़ाचा व्यवहार सध्या चीनच्या बाबतीत सुरू आहे. चीनची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे ती भारताच्या सहकार्याने. त्याच मजबूत अर्थव्यवस्थेचा वाटा पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी वापरला जातो हे आपण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी अनुभवले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे वारंवार सांगण्यात आले. आता ते दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्या आपली चिंता वाढवणाऱ्या आहेत व अशा वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नक्की काय करतात? पाकिस्तानची भीती कायम आहे. 25 चर्चेच्या फेऱ्यांनंतरही चीन-भारत सीमावाद पुढे सरकलेला नाही. भारताच्या सीमेवरील तणावात चीन, पाकिस्तानचा हात आहे. मि. डोवाल, चीनमध्ये हा हात मुळापासून उखडायला गेले असतील तर आनंदच आहे!