तिबेटमधून आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार, 1000 लोक वाहून गेल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. पुरामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तिमुरेसह जवळच्या दोन बाजारपेठा पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या प्रलयात 1,000 लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी मिळाली नाही. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी नेपाळी लष्कराची दोन हेलिकॉप्टर रसुवाकडे रवाना झाली आहेत.

रसुवा जिल्हा पोलीस कार्यालयाच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तिमुरे बाजार वस्तीला अचानक आलेल्या मोठ्या पुराचा तडाखा बसला. या अचानक आलेल्या पुरामुळे खालच्या किनारपट्टी भागातील जलविद्युत प्रकल्पही वाहून गेले असून, पुराचे पाणी वस्त्यांमध्येही शिरले आहे, असे रसुवाचे मुख्य जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी सांगितले. भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे, रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन या जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या नदीकिनारी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरामुळे बाजार आणि सीमाशुल्क कार्यालय परिसराचेही मोठे नुकसान झाले आहे. रसुवा सीमाशुल्क परिसरात मोठ्या संख्येने वाहने आणि इतर सामान होते, जे पुराच्या पाण्यात वाहून गेले. गेल्या वर्षीच्या पुराच्या ठिकाणी नुकताच बांधलेला एक नवीन पूलही पुराच्या पाण्यात वाहून गेला, असे रसुवाचे सहायक मुख्य जिल्हा अधिकारी ध्रुव प्रसाद अधिकारी यांनी सांगितले. तिबेटमधून आलेल्या पुरामुळे नेपाळ पोलिसांच्या तीन कार्यालयांचेही मोठे नुकसान झाले आहे. रसुवामधील पूरस्थिती आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन, वाहतूक पोलिसांनी काठमांडूहून रसुवा, नुवाकोट, चितवन आणि धादिंगकडे जाणारी वाहने थांबवली आहेत.