
अमित शहांची कितीही इच्छा असली तरी, त्यांनी कितीही कारस्थानं केली, कितीही पक्ष फोडले, कितीही खासदार जमवले, कितीही मोदींच्या विरोधात स्वतःची गँग निर्माण केली तरीही त्यांना देशाचं पंतप्रधान होऊ देणार नाही, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळे मोदींना चालवलं जातंय. माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये देशाच्या नेतृत्वाबाबात अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे, असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींनी सरकारला त्यांनी कोंडीत पकडलं आहे. आणि राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून जो दबाव निर्माण केला आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारची लक्तरं मांडली आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल करावे लागतील. कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतोय. पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही विद्रुप मुंडकं तेच ठेवाल आणि बाकी सगळी सर्जरी कराल तर त्याला रिशफल नाही म्हणत. स्वतः नरेंद्र मोदी यांची प्रतिमा घसरली आहे. अमित शहा यांना कोणतीच प्रतिमा राहलेली नाही. जवळ जवळ 99 टक्के मंत्री अकार्यक्षम आहेत. आणि भाजपमध्ये एखाद दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीयमंत्रिमंडळात काम करू शकतील असे दिसत नाहीत. शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी ही मोठी नावं आहेत. बाकी सगळे राम भरोसेच चालले आहे. आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर आणि गतीवर, कार्यक्षमतेवर होत आहे. मोदींची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे. कारण मोदींना काम झेपत नाही. अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळली आहे की, ते गृहखाते चालवत नसवून वर्दीतल्या गुंडांची एखादी टोळी चालवतात असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे. आणि या सगळ्यांचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर झाला आहे हे मोदींना पटतंय. या रिशफलमधून अमित शहांना बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत कुठल्याही रिशफलला अर्थ नाही. ही साधारण दिल्लीच्या वर्तुळातली चर्चा आहे, असे संजय राऊत म्हणाले. राहुल गांधींसोबत माझी महाराष्ट्रातल्या घडामोडींविषयी चर्चा झाली. राहुल गांधींचं नेतृत्व मोदींना मागे टाकून आता खुप पुढे गेलेलं आहे. मोदी सत्तेवर आहेत म्हणून या क्षणी नेते आहेत. ज्या क्षणी मोदी सत्तेत नसतील त्या क्षणी ते नेते नसतील. राहुल गांधीचं तसं नाही. राहुल गांधी या देशाचे Undisputed नेते झालेले आहेत, आणि ते तुम्हाला दिसत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
जसे नेहरु थकले होते तसे मोदीही आता थकले आहे. आणि एवढं थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये. राष्ट्रहितासाठी मोदी आणि अमित शहांनी आता दूर व्हायला हवं. जर राष्ट्रप्रथम असेल तर मग त्यासाठी त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे, आणि मार्गदर्शकाच्या भुमिकेत रहायला पाहिजे. यालाच देशसेवा म्हणतात. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाचं नेतृत्व करून यात राष्ट्रहित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी मोदींची खिल्ली उडवली जात आहे, मोदींचे मित्र असलेले ट्रम्प, आणि अमेरिकेचे राजदूत यांनी सांगितले की मोदी गयावया करत होते की पत्रकार परिषदा घेऊ नका म्हणून. हे चांगल्या किंवा उत्तम आरोग्याचे लक्षण नाही. मोदींनी आत्मविश्वास गमावलेला आहे, त्याचा हा परिणाम आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मोदींना आता जबरदस्तीने तिथे लादलं जात आहे. कारण भाजपकडे दुसरा चेहरा दिसत नाही. कारण आहे ते चेहरे विद्रूप आहेत. अमित शहांना कधीच कुणी पंतप्रधान करणार नाहीत. अमित शहांची कितीही इच्छा असली तरी, त्यांनी कितीही कारस्थानं केली, कितीही पक्ष फोडले, कितीही खासदार जमवले, कितीही मोदींच्या विरोधात स्वतःची गँग निर्माण केली तरीही त्यांना देशाचं पंतप्रधान होऊ देणार नाही. त्यामुळे मोदींना चालवलं जातंय. माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये देशाच्या नेतृत्वाबाबात अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. .
देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जावं लागेल. त्यांना केंद्रातली जबाबादारीही घ्यावी लागेल. त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी ही सुरुवात आहे. आणि फडणवीस त्यासाठीच वारंवार दिल्लीत जात आहेत. अमित शहांसोबत कुठलाही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही. ही अनेक ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांची भूमिका आहे आणि याबाबत मोदींना कल्पना आहे. दिल्लीत अमित शहांसोबत फडणवीसही काम करायला तयार नाहीत. इतर भाजप नेत्यांनीही अमित शहांसोबत काम करायला नकार दिला आहे, असे संजय राऊत म्हणाले. .
इंडिया आघाडीचे भवितव्य चांगले आहे. जेन झी च्या मागे इंडिया ब्लॉक नसता, राहुल गांधींनी ज्या प्रकारे वातावरण निर्माण केलं. मुंबईत आणि महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात उपक्रम हाती घेतले. अनेक राज्यांमध्ये त्या त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली त्यामुळे जेन झी ला बळ मिळालं. आम्ही आमच्या पद्धतीने राज्यात काम करत आहोत. याचा फायदा शेवटी इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला होणार आहे.
अमित शहांसोबत कुणीही काम करायला तयार नाही. अमित शहांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची नरेंद्र मोदींची मानसिकता आहे. आत ते किती धाडसाने निर्णय घेतील हे पाहू. पण आज या देशाची जी दुर्गती झालेली आहे, ज्या पद्धतीचे हुकुमशहा वातावरण निर्माण झाले आहे. लोकांमध्ये अस्वस्थता आणि अस्थिरता आहे, त्यासाठी सर्वात जास्त जबाबदार नरेंद्र मोदींपेक्षा अमित शहा आहे. अमित शहांनी या देशाच्या राजकारणात विषारी प्रवाह आणले. खासदार आमदार विकत घेऊन फोडणं, निवडणूक आयोग आणि न्यायालयावर दबाव आणणं, या अपप्रवृत्ती गेल्या 12 वर्षात अमित शहांनी आणलेल्या आहेत. आणि मोदी त्यांच्यामागे फरपटत गेले. याची जाणीव मोदींना झाली आहे असं मोदींचे सहकारी सांगतात.
संसदेत एखाद्या पक्षाचं पूर्ण बहुमत जर असेल आणि त्याचं नेतृत्व एखादा नेता करत असेल तर त्या बहुमताच्या जोरावर तो आपला अजेंडा पूर्ण करू शकतो. मोदींच्या ठिकाणी जरी नितीन गडकरी, अरुण जेटली असते तरी त्यांचे अजेंडे बहुमताच्या जोरावर पूर्ण केले असते. त्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला देता येणार नाही. कलम 370 तर हटवलं मग आज कश्मीरची अवस्था काय आहे? या स्वातंत्र्यदिनाला कश्मिरी पंडितांनी बाहेर पडू नये अशी सूचना गृहखात्याने दिली आहे. 370 कलम काढल्याचा हा परिपाक आहे. अतिरेक्यांच्या अनेक टोळ्या कश्मीरमध्ये घुसल्याची माहिती आहे. कश्मिरी पंडितांना स्वातंत्र्यदिन साजरा करता आला नाही, त्यांनी घराच्या बाहेर पडू नये अशी जर सूचना गृहखाते करत असेल तर कश्मीरमध्ये काय स्थिरस्थावर झाले आहे? 370 कलम कागदावरून हटवलं पण कश्मीर आमचं झालं का? जोपर्यंत कश्मिरात हिंदु आणि कश्मिरी पंडित निर्भयपणे वावरत नाहीत, तरच 370 कलम हटवलं आणि त्याचा फायदा हिंदु आणि देशाला फाय झाला असं म्हणता येईल. दोन दिवसांपूर्वी कश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा टोळ्या आल्या अशी माहिती आहे, अशा वेळी कश्मिरी पंडितांनी बाहेर पडू नये अशी सूचना जर गृहखात्याला काढावी लागत असेल तर ते अमित शहांचं अपयश आहे. अमित शहा कुणाच्याही गुडबुक्समध्ये नाहीत. अगदी नरेंद्र मोदींच्याही नाही, हा माझा दिल्लीतला अनुभव आहे, असे संजय राऊत म्हणाले. .
तुम्ही जर हजारो रिक्षा टॅक्सी चालकांचा प्रश्न गांभीर्यीने घेणार नसाल, त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देणार नसाल तर मिस्टर प्रताप सरनाईक तुम्ही निष्ठूर आणि क्रूर आहात. शिष्टमंडळ जर तुमच्याकडे वेळ मागत असेल आणि तुम्ही तो देत नाही मग तुम्ही करता काय? नाक्यांवरचं कलेक्शनचंच काम आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे सगळी माहिती आहे, कोणत्या नाक्यावरून काय जातं. परिवहन मंत्र्यांकडे जर ही माहिती नसेल तर मी देतो. रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाला त्यांना भेटावं लागेलं. रॅपिडो सारख्या कंपन्या अनेक इव्हेंट्सला स्पॉन्सरशिप देते, परिवहन मंत्र्यांच्या इव्हेंटलाही रॅपिडोने स्पॉन्सरशिप दिली आहे. ज्या रॅपिडोमुळे हजारो रिक्षाचालकांचा रोजगार बुडाला आहे, त्या रॅपिडोने गेल्या काही वर्षात दहीहंडी, गणेशोत्सव मंडळांना किती कोटी रुपये दिले याची माहिती देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागेल.
मला वाटतं पंतप्रधान मोदी यांची तब्येत बरी नाहिये. त्यांची मानसिक आणि शारिरीक तब्येत बिघडली आहे. लोक म्हणतात की मोदी झोपत नाहीत, असं असेल तर हा सर्वात मोठा आजार आहे. कुठल्या चिंतेत ते फसले आहेत ते बघावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतंय की मोदी आणि शहांची पाठवणीची वेळ आली आहे असे संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.

























































