इस्लामाबादमधील सरकारी रुग्णालयात भीषण आग, 15 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका सरकारी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत किमान १५ नवजात बाळांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसीत बिघाड झाल्याने कॉम्प्रेसरचा स्फोट झाला व त्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

इस्लामाबादमधील ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (PIMS) या नामांकित रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘एमसीएच’ वॉर्डमधील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ही दुर्घटना घडली. आग लागली तेव्हा वॉर्डमध्ये एकूण १६ नवजात बाळं होती. त्यापैकी केवळ एका बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर उर्वरित १५ बालकांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ६ गाड्या आणि ४ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हा उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण आणि घटनेमागील जबाबदार घटकांचा शोध ही समिती घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.