
पनवेल शहरातून खांदा वसाहतीत जाण्यासाठीचा शॉर्टकट असलेला रेल्वे अंडरपास सध्या नागरिकांसाठी ‘डोक्याला शॉट’ ठरला आहे. या अंडरपासमध्ये पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या चिखल मय पाण्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चांगू काना ठाकूर महाविद्यालय परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. विद्यार्थ्यांची सकाळ-संध्याकाळ या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण झाले आहे. अंडरपासमधील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वारांना तर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत.
कंबरदुखीचा त्रास
खड्ड्यांतून वाहन गेल्यानंतर बसणाऱ्या जोरदार धक्क्यांमुळे प्रवाशांना कंबरदुखी व पाठीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच खड्ड्यांतील चिखलमय पाणी वाहनांमुळे उडून विद्यार्थ्यांचे कपडे खराब होत असल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.































































