
गेल्या आठवड्यात ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ या मी लिहिलेल्या ११ व्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार तसेच दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन. सिंग या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी तिन्ही मान्यवरांनी माझ्या लिखाणाची मुक्तहस्ते, उदार मनाने प्रशंसा केली तेव्हा माझ्याही भावना दाटून आल्या.
१९९२ पासून क्राईम रिपोर्टिंग करताना माझा मुंबईच्या २५ पोलीस आयुक्तांशी संबंध आला. अमरजित सिंग सामरा ते सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती या सर्व पोलीस आयुक्तांच्या व त्याआधीच्या २२ अशा स्वातंत्र्यानंतरच्या ४७ पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या काळातील बऱ्या-वाईट घटनांवर, संघटित गुन्हेगारीवर मी प्रकाश टाकला आहे. ब्रिटिश काळातील १९ पोलीस आयुक्तांपैकी सर फ्रँक साऊथर, एस. एम. एडवर्डस्, सर पॅट्रिक केली, आर. एच. व्हिनसेंट या अत्यंत कर्तबगार पोलीस आयुक्तांच्या कार्यशैलीचीही मी माहिती दिली आहे. ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ या पुस्तकात मुंबईची सखोल माहिती दडलेली आहे. प्रत्येक पोलिसाने, मुंबईत नव्याने दाखल झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनी हे पुस्तक वाचावे, संग्रही ठेवावे इतके ते वाचनीय झाले आहे. सत्यघटनांचा रोमांचकारी इतिहास मांडण्यात आला आहे. पोलीस दलाच्या नेतृत्वाचा, त्यांच्या योगदानाचा त्यात वेध घेण्यात आला आहे. त्यामुळे माझे हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरेल याची मला खात्री आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तिन्ही मान्यवरांनी आपले रोखठोक विचार आपल्या भाषणात मांडले. त्यात मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त देवेन भारती म्हणाले, “पुराव्याची जुळवाजुळव करून तपास केला जातो. गुन्हा उघडकीस आणला जातो. तेव्हा त्याचे श्रेय आमचे वरिष्ठ अधिकारी घेतातः परंतु बऱ्याचदा गुन्ह्याचा खरा शोध फील्डवर असलेल्या आमच्या तळागाळातील साध्या कॉन्स्टेबलने घेतलेला असतो. आरोपीला पकडण्यासाठी तो साधा शिपाई अधिक मेहनत घेत असतो. अशा कर्तबगार तसेच उत्कृष्ट तपास करणाऱ्या कॉन्स्टेबलवर पुस्तक लिहिण्याची आता गरज आहे, असेही पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सुचविले.
पोलीस आयुक्त देवेन भारती बोलले ते खरे आहे. पथकाचे नेतृत्व निश्चितच वरिष्ठ अधिकारी करतात. तपासाला दिशा तेच देतात. पथकाला मार्गदर्शन करतात. कायदेशीर बाबी तपासतात, परंतु माहिती मिळाल्यानंतर सामान्य कॉन्स्टेबल साध्या वेशात जिथे माणसाच्या जिवाला धोका असतो अशा ठिकाणी तासन्तास पाळत ठेवतात. आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतात. गल्लीबोळातून फिरतात. चहाच्या टपरीवर बसतात. दुकानदारांशी, रिक्षाचालकांशी संवाद साधतात. माहिती देणाऱ्या साक्षीदाराचे मनोधैर्य वाढवतात. उन्हा-पावसात आरोपी शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत धावपळ करीत असतातः परंतु आपला जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना पकडणाऱ्या कॉन्स्टेबलना हवी तशी प्रसिद्धी दिली जात नाही, अशी खंत पोलीस आयुक्तांनी व्यक्त करून, गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर पुस्तक लिहिण्याचे त्यांनी सुचविले आहे.
मुंबई पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कॉन्स्टेबलवर पुस्तक लिहिण्याची, त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्याची गरज आहे. १९४२ ते १९७९ या काळात खबऱ्यांचे जाळे निर्माण करून मुंबई पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पांडुरंग सावळाराम सावंत ऊर्फ पांडू जमादार या कॉन्स्टेबलवर तर पुस्तक लिहिण्याची खरोखर गरज आहे. पांडू जमादार हे सिद्धहस्त गुप्तहेर होते. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबईतील गाजलेल्या लॉयडस् बैंक, बुस स्ट्रीट, मरोळ, टाऊन हॉल आदी दरोड्यांच्या केसेस डिटेक्ट केल्या होत्या. अनेक गुंतागुंतीच्या गुन्हयांवर प्रकाश टाकला होता. अशा या डिटेक्टिव्ह जमादाराचा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण पदक बहाल करून गौरव केला होता. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त व्ही. व्ही. चौबळ यांनी कौतुक केले होते. प्रसिद्ध सिनेनिर्माते व अभिनेते दादा कोंडके यांनी तर पांडुरंग जमादार यांच्या Excellent Investigation वर आधारित पांडू हवालदार’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि हा चित्रपट भरपूर गाजला होता. पांडू, जमादार यांचा चोर-दरोडेखोरांमध्ये प्रचंड दरारा होता. पांडू जमादार यांचे दोन मुलगे अलीकडेच ‘एसीपी’ म्हणून सेवानिवृत्त झाले.
पांडू जमादार यांच्याप्रमाणे नसानसात डिटेक्शन व उत्कृष्ट इन्व्हेस्टिगेशनची कला असलेले असे असंख्य पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस दलात, विशेषतः मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचमध्ये होते व आहेत. त्यात अलीकडेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले दीपक रासम, बुलेट पाटील (सुरेश पाटील), दत्ता शिंदे, गणेश बहू, अभय दुधवडकर, अरुण जाधव देशमाने, सुर्वे, उदय भुवड, शेख, मिश्रा, अन्वर इरफान, अहिरे, रईस, दाढी पाटील, हवालदार राऊत, देशमुख, परब व दिवंगत झालेले बाळा हातीसकर, मनोहर साळवी या पोलीस शिपायांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. पांडू जमादार यांच्यासारखे खबऱ्यांचे जाळे विणणारे असे असंख्य पोलीस शिपाई मुंबई पोलीस दलात आहेत. त्यांचा यथोचित गौरव होणे, त्यांच्या नावाची राष्ट्रपती पदकासाठी वरिष्ठांनी शिफारस करणे गरजेचे आहे, परंतु पोलीस दलात आपल्याच मर्जीतील पोलीस निरीक्षकांची, शिपायांच्या नावाची शिफारस काही वरिष्ठ करीत असतात. हे थांबले पाहिजे. पोलीस दलातील दुर्लक्षित झालेल्या पांडू जमादारांना न्याय मिळाला पाहिजे.






























































