
शिराळा शहरातील ऐतिहासिक नागपंचमी उत्सवाची धार्मिक परंपरा आणि पावित्र्य जपण्यासाठी अनिर्बंध डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सत्यजित देशमुख, सांगली जिल्हाधिकारी, शिराळ्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
शिराळा येथील नागपंचमीला प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा असून, या उत्सवाची देशभरात ओळख आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक, पालखी सोहळा, गायन, वादन आणि लोककला यांना प्रोत्साहन देत उत्सवाचे पारंपरिक स्वरूप जपणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडील काळात मिरवणुकांमध्ये मोठय़ा आवाजातील डीजे लावले जातात व सार्वजनिक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे धार्मिक उत्सवाच्या पावित्र्यावर परिणाम होत आहे. मोठय़ा आवाजातील ध्वनिवर्धकांमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मिरवणुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
मिरवणूक मार्ग निश्चित करून प्रत्येक मंडळाला क्रमांक देण्यात यावा, सार्वजनिक ठिकाणी डीजे व ध्वनिवर्धक वापरण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक करावी, ध्वनिप्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे काटेकोर पालन करावे, परवानगीच्या अटींचे उल्लंघन करणाऱयांवर नियमानुसार कारवाई करावी आणि सण-उत्सवाच्या काळात प्रशासन व पोलिसांनी विशेष पथकांमार्फत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवावे. ऐतिहासिक उत्सवांची परंपरा आणि सांस्कृतिक ओळख पुढील पिढय़ांपर्यंत जपण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस नियोजन करून आवश्यक निर्बंध व कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अश्विनी कदम, नेहा सूर्यवंशी, सीमा डांगे, सीमा कदम, अश्विनी डांगे, शालवी महाजन, अर्चना कदम, सुनंदा शेवाळे, ऍड. नरेंद्र सूर्यवंशी, मोहन जिरंगे, उत्तम डांगे, नीता शिंदे, स्मिता कदम, प्रियांका कदम, ललिता गायकवाड, भारती जाधव, वैशाली नाईक, राधादेवी देशमुख, जिज्ञा गायकवाड, अजित दुबुले, बाळू शिंदे, सुरेश नलावडे, अनिल डांगे यांच्यासह जय जिजाऊ मंडळाच्या महिलांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात होती.































































