भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्र्यात आज ‘नो एण्ट्री’; वाहतुकीमध्ये बदल; पोलिसांची अधिसूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्यात वाहनचालकांना उद्या बुधवारी २६ ऑगस्टला ‘नो एण्ट्री’ असणार आहे. मुस्लिम बांधवांच्या ईद-ए- मिलाद सणानिमित्त भव्य मिरवणुका काढल्या जात असल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल केले आहेत. दुपारी २ ते रात्री १० पर्यंत वाहतूक बदलाची अधिसूचना वाहतूक विभागाने काढली आहे.

असे असतील बदल

वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राष्ट्रीय महामार्ग ८ येथून किंवा मुंबई महानगर जलवाहिनीमार्गे वाहतूक करतील.

वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांबोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने धामणकर नाका जलवाहिनीमार्गे वाडापुढे जातील.

ठाणे के व्हिला नाका मार्ग राबोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने के व्हिला नाका येथून सरळ माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक रोडने जुनी राबोडी पोलीस स्टेशनमार्गे इच्छितस्थळी जातील.

कल्याण पत्रीपूल, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने पत्रीपूल येथून डावे वळण घेऊन गोविंदवाडी बायपासमार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

रेतीबंदरमार्गे मुंब्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना रेतीबंदर येथे तसेच वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने रेतीबंदर मुंब्रा बायपासमार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

रेतीबंदरमार्गे मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी व सरकारी बसेस यांना रेतीबंदर येथे तसेच वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने रेतीबंदरमार्गे येथेच प्रवाशांना उतरवून परत जातील किंवा बासपासमार्गे इच्छितस्थळी जातील.