
कश्मिरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी या मोहिमेच्या लष्करी कारवाईदरम्यान हिंदुस्थानी लष्कर पाकव्याप्त कश्मिरमधील महत्त्वाच्या ‘स्कार्दू एअरबेस’वर हल्ल्याच्या तयारीत असताना ऐनवेळी खराब हवामानामुळे हा हल्ला थांबवण्यात आला. स्कार्दूवरील हल्ला रद्द करून हिंदुस्थानी लष्करी नेतृत्वाने तातडीने रणनीती बदलली आणि पाकिस्तानमधील ‘भोलारी एअरबेस’ला लक्ष्य केले होते. माजी सीडीएस (CDS) जनरल अनिल चौहान यांनी एका विशेष कार्यक्रमात यासंदर्भातील माहिती दिली आहे.
हिंदुस्थानच्या हवाई दलाने (IAF) पाकिस्तानच्या हद्दीत घुसून मोठी कारवाई करण्याचे ठरवले होते. माजी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानने पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) स्कार्दू येथील पाकिस्तान वायुसेनेच्या तळावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. पण ऐनवेळी खराब हवामानामुळे ही मोहीम रद्द करावी लागली. स्कार्दूवरील हल्ला रद्द झाल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने तातडीने रणनीती बदलली आणि नव्या लक्ष्याची निवड केली आणि आपला मोर्चा भोलारी एअरबेसकडे वळवला.
या मोहिमेदरम्यान, गांधीनगर येथील दक्षिण पश्चिम वायु कमांडद्वारे (SWAC) राबविण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात भोलारी एअरबेसवरील हँगरला हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी अचूक लक्ष्य केले. हा हल्ला मोहिमेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक क्षण ठरला होता. हवामानाची प्रतिकूल परिस्थितीमुळे जरी स्कार्दूला लक्ष्य केले नसले, तरी हिंदुस्थानी हवाई दलाच्या या प्रभावी प्रत्युत्तराने पाकिस्तानच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान केले. मिळालेल्या छायाचित्रांमध्ये या हँगरच्या छताला मोठे खिंडार पडल्याचे आणि स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर नष्ट झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. या मोहिमेमुळे हिंदुस्थानची धोरणात्मक क्षमता जगासमोर सिद्ध केली.
या संपूर्ण कारवाईदरम्यान किरणा हिल्सवर झालेला स्फोट हा चुकून घडल्याचेही स्पष्ट झाले आहे. इस्रायल निर्मित ‘हॅरोप’ (Harop) यांसारखे हिंदुस्थानीलोईटर म्युनिशन्स (ड्रोन) रडार शोधत असताना इंधन संपल्यामुळे सरगोधापासून उत्तरेला असलेल्या किरणा हिल्सच्या परिसरात येऊन धडकले होते, असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानातील स्कार्दू येथे स्थित असलेले हे ‘PAF बेस कादरी’ हे पाकिस्तान वायुसेनेचे एक महत्त्वपूर्ण फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस आहे. हिंदुस्थानच्या या नियोजित हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यात मोठी खळबळ उडाली होती.


























































