
लोटे औद्योगिक वसाहतीत आलो तेव्हा एका भल्या मोठ्या खड्ड्याने माझे स्वागत केले. औद्योगिक वसाहतीत आलोय की कन्सट्रक्शन साईटवर आलोय असा प्रश्न पडला. आज औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा नाहीत. चाकण, हिंजवडी पाठोपाठ लोटेतील उद्योग बंद होऊन बाहेर चालले आहेत. कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प आणले जात आहेत. म्हणजे कोकणात ‘राख’ आणि ‘रांगोळी’ गुजरातमध्ये काढली जात आहे, अशी खरमरीत टीका करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे यांनी आज लोटे औद्योगिक वसाहतीची पहाणी केली. त्यानंतर उद्योगभवन येथे उद्योजकांसोबत त्यांनी चर्चा केली. उद्योजकांना त्यांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे उद्योजकांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत खरपूस समाचार घेतला. शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, आज चाकणमधील २० उद्योग बंद होत आहेत. त्यांच्यावर राज्याच्या बाहेर जायची वेळ आली आहे. मी तिथे जाऊन उद्योजकांना भेटलो आहे. त्यानंतर लोटे औद्योगिक वसाहतीतीतही उद्योजक अडचणीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आज लोटे येथे बंद दाराआड मी उद्योजकांशी चर्चा केली. कारण त्यांच्यावरही दबाव आहे. त्यांना कसंही अडचणीत आणले जाईल, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. आमचे सरकार असताना सुभाष देसाई उद्योगमंत्री होते आणि मी पर्यावरण मंत्री होतो. त्यावेळी उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली होती. दुर्दैवाने पुढील काही महिन्यात आमचे सरकार गेले. मात्र त्यानंतर आलेल्या सरकारने त्यावर अपेक्षित कामचं केले नाही आणि उद्योजकांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री महाराष्ट्रात उद्योग आणल्याच्या, गुंतवणूक आणण्याच्या घोषणा करतात. पण हे सर्व हवेत असते. आज महाराष्ट्रातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. काही उद्योग राज्याच्या बाहेर जात आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख अंकुश काते आणि जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे उपस्थित होते.
“मी येणार म्हणून डागडुजी झाली आणि आज पाऊस पडला आणि…”
मी दौरा करणार म्हणून डागडुजी करण्यात आली. मात्र, आज पाऊस पडला. त्यामुळे सगळचं उघडं पडलं. मी येऊन गेलो की सर्वजण कामाला लागतात. चाकणला मी जाऊन आलो तेव्हा दुसऱ्या दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत चाकणला जाऊन पाच-सहा तास बसले होते. त्यांनंतर उपमुख्यमंत्र्यांनाही जावे लागले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
“मुख्यमंत्र्यांनी माझ्या सोबत औद्योगिक वसाहतीत चालून दाखवावे”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत चाकण किंवा लोटे औद्यागित वसाहतीत चालून पहावे. लोटे औद्योगिक वसाहतीत येणार असतील तर मी उद्या पुन्हा इथे येतो. त्यांनी माझ्या सोबत चालून उद्योजकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. आज औद्योगिक वसाहतीत वीज नाही, पाणी नाही आणि रस्तेही नाहीत. मग उद्योग कसे उभे रहाणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्योग बंद होत असल्याने रोजगार हिरावून घेतला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
“प्रदूषणकारी प्रकल्प उद्योगमंत्र्यांना माहित नाहीत का?”
लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी लोटे येथे पीफास सारखे घातक रसायनाचे उत्पादन करत असल्याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रदूषणकारी प्रकल्प हे उद्योगमंत्र्यांना माहित नव्हते का? आज उरणमध्ये तर श्वास घेऊ शकत नाही अशी अवस्था आहे. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात आणून कोकणाची राख आणि चांगले प्रकल्प गुजरातला पाठवून तिथे रांगोळी घातली जात आहे, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली. कोकणात येणाऱ्या प्रदूषणकारी प्रकल्प आणि मायनिंगबाबत आमची भूमिका पहिली होती तीच आहे. कोकणात बेकायदेशीर मायनिंग होता कामा नये, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.





























































