आशा भोसले यांचा अजरामर आवाज पुन्हा घुमणार; वाढदिवशी प्रदर्शित होणार शेवटचे गाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या चाहत्यांसाठी एक भावुक करणारी बातमी आहे. त्यांनी चित्रपटासाठी गायलेले शेवटचे गाणे ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ हे त्यांच्या वाढदिवशी, म्हणजेच 8 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘ओम का हरी’ या आगामी ड्रामा-कॉमेडी चित्रपटातील हे गाणे त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे. आशा भोसले यांनी हे गाणे 2023 मध्ये रेकॉर्ड केले होते. त्या वेळी त्यांचे वय 90 वर्षांहून अधिक होते. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतील हे गाणे एका अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.

‘ओम का हरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केले असून, अभिनेता अंशुमन झा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित असून, त्यात भावनिकतेसोबत विनोदाचीही सांगड घालण्यात आली आहे. आपल्या चित्रपटात आशा भोसले यांचा आवाज असणे ही आयुष्यातील अत्यंत खास गोष्ट असल्याचे अंशुमन झा यांनी म्हटले आहे. असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

दिग्दर्शक हरीश व्यास यांनीही गाण्याच्या प्रदर्शनासाठी आशाजींचा वाढदिवस निवडण्यामागील कारण सांगितले. “आशाजींचा अजरामर आवाज, त्यांचा अफाट वारसा आणि त्यांच्या संगीताने प्रभावित झालेल्या पिढ्यानपिढ्यांच्या श्रोत्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी हे गाणे त्यांच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी म्हटले.

एप्रिल 2026 मध्ये आशा भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आवाजातील हे शेवटचे चित्रपटगीत त्यांच्या चाहत्यांसाठी केवळ एक गाणे न राहता, त्यांच्या समृद्ध संगीतप्रवासाची भावनिक आठवण ठरणार आहे. 8 सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ प्रदर्शित झाल्यानंतर आशाजींचा जादुई आवाज पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.