नेपाळमध्ये तामिळनाडूचे 37 पर्यटक बेपत्ता; डीएमके खासदारांची परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे तामिळनाडूतील पर्यटक अडचणीत सापडले आहेत. तमिळनाडूमधील 57 जण 13 दिवसांच्या पर्यटनासाठी नेपाळ आणि उत्तर हिंदुस्थानात गेले होते. त्यापैकी 20 जणांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरित 37 पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या प्रकरणी डीएमके खासदार दयानिधी मारन यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. नेपाळमधील हिंदुस्थानी दूतावास आणि बचाव पथकांना सक्रिय करून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यात यावा, तसेच त्यांना सुरक्षितपणे हिंदुस्थानात परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभकोणम येथील एका पर्यटन संस्थेच्या माध्यमातून हा 13 दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या गटात कुंभकोणम, मयिलादुथुराई, होसूर आणि आसपासच्या भागातील नागरिकांचा समावेश होता. पर्यटक तीन बसमधून प्रवास करत होते.

पर्यटकांनी नेपाळमध्ये सुमारे दोन दिवस घालवल्यानंतर सीमा ओलांडून तिबेटच्या दिशेने प्रवास केला. याचदरम्यान परिसरात नैसर्गिक आपत्ती आली. तीन बसपैकी एका बसमधील 20 प्रवाशांनी पर्यटन संस्थेशी संपर्क साधला असून ते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. मात्र, उर्वरित दोन बसमधील 37 प्रवाशांशी संपर्क झालेला नाही. या गटाचे नेतृत्व पर्यटन संस्थेच्या मालकाचा मुलगा उमर फारूक करत होता. त्याच्याशीही अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे असे वृत्त आज तक ने दिले आहे. नेपाळमध्ये अतिवृष्टी आणि अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांतील रस्ते व पूल वाहून गेले आहेत. संपर्क यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बचावकार्य करताना अडचणी निर्माण होत आहेत.

दरम्यान, नेपाळच्या रसुवा भागात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मोठी हानी झाली आहे. अनेक हिंदुस्थानी पर्यटक आणि ट्रेकर्स बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या लष्करासह विशेष बचाव पथके आणि वैद्यकीय पथके बचावकार्यात सहभागी झाली आहेत. तामिळनाडूतील बेपत्ता पर्यटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे हिंदुस्थानात आणण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व मदत करावी, अशी मागणी दयानिधी मारन यांनी केली आहे.